पुणे जिल्हा | सात गरजू मुलांच्या शिक्षणाची मराठे कुटुंबीयांनी घेतली जबाबदारी

पौड, (वार्ताहर) – वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त परिसरातील सात गरजू मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मराठे कुटुंबीयांनी घेतली आहे. कुळ्याचे दिवंगत सरपंच बबनराव मराठे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांचा मुलगा उद्योजक अरुण बबनराव मराठे, अमोल बबनराव मराठे, पत्नी मंदा बबनराव मराठे,
मुलगी अश्विनी दत्तात्रय इंगवले, सूना रसिका अरुण मराठे व दिपीका अमोल मराठे, असे संपूर्ण मराठे कुटुंबीयांनी समाजात आदर्शवत असा एक वेगळा व अनुकरणीय पायंडा पाडत परिसरातील सात अनाथ तथा गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
दिवंगत बबनराव मराठे यांच्या पुण्यस्मरण दिनी सायंकाळी पाच वाजता ह.भ.प. कृष्णा महाराज पडवळ यांची प्रवचन सेवा संपन्न झाली. त्यानंतर ह.भ.प.विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर) यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.
त्यानंतर परिसरातील अनाथ व गरजू मुलांच्या संपूर्ण शैक्षणिक पालकत्त्वाची जबाबदारी यावर्षीपासून घेण्याचा संकल्प कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. त्याप्रमाणे आज तो पूर्ण करीत परिसरातील अनाथ व गरजू सात मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारली. तसेच वडिलांच्या स्मरणार्थ कुळे येथील जिल्हा परिषद शाळा येथे मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रम प्रसंगी घावरे बाबा मंदिर बांधकाम करण्यासाठी एक लाखांचा धनादेश बाळासाहेब घावरे यांच्याकडे देण्यात आला. तर गुरुकृपा गुरुकुल इमारत बांधकामासाठी पासष्ट हजार रुपयांचा धनादेश वैभव महाराज दुडे यांच्याकडे देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मारणे यांनी केले.या कार्यक्रमास मधुर दाभाडे,कुळे मराठेवाडी येथील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी व ग्रामस्थांनी उपस्थित होते.





