पुणे जिल्हा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठी जबाबदारी देणार – अतुल बेनके

पराभवाने न खचता नव्या उमेदीने जनतेची सेवा करणार
स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार
नारायणगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) भविष्यात जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी देणार असल्याचे बेनके यांनी सांगितले.
गुरुवारी (दि. 28) स्व. वल्लभ बेनके यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती संजय काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, गणपतराव फुलवडे, सुप्रिया लेंडे, उज्वला शेवाळे, पापा खोत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार बेनके म्हणाले, जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने जनतेची सेवा करणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्याचा आनंद झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होणार असून त्याचा फायदा जुन्नर तालुक्याला होणार आहे.
जुन्नर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असून जुन्नर तालुक्यात माझ्या काळात सुरू केलेले प्रकल्प मोठ्या ताकदीने पूर्ण करणार असल्याचे बेनके यांनी स्पष्ट केले.
विघ्नहर कारखान्याची निवडणूक लढणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांना वार्यावर सोडणार नसून कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीनिशी उभी राहणार आहे. जुन्नर शहरात स्वतंत्र कार्यालय स्थापन करून विविध कामांसाठी आदिवासी भाग व तालुक्यातील कानाकोपर्यातून येणार्या लोकांना मदत व मार्गदर्शन करणार आहे. पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करून बूथ रचना मजबूत करणार आहे. सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क करणार असून श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना निवडणूक लढवणार असल्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.





