“अध्यक्षपद जाऊन मंत्रिपद मिळाले तर आनंद कसा होईल? पण वरिष्ठ सांगितलं…”; राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले

Rahul Narvekar : मुंबई माध्यमांच्या अहवालांवर मी विश्वास ठेवत नाही, मी फक्त पक्ष नेतृत्त्वावर विश्वास ठेवतो. आमचे पक्ष नेतृत्व सध्या दिल्लीत आहे, योग्य ठिकाणी आहे. तसेच विधानसभेचे अध्यक्षपद हे मंत्रिपदापेक्षा श्रेष्ठ असते.
त्यामुळे अध्यक्षपद जाऊन मंत्रिपद मिळाले तर त्याचा आनंद कसा होईल? तरीदेखील पक्षातील वरिष्ठ नेते देतील ती जबाबदारी पार पाडायला मी तयार आहे, असे सूचक विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
राज्यातील महायुती सरकारमध्ये लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली.
राहुल नार्वेकर म्हणाले, विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाजाचा दर्जा उंचावण्याची संधी मला मिळाली. विधानसभेचे अध्यक्षपद असेल, मंत्रिपद असेल किंवा आमदार म्हणून मला काम दिलेले असेल, प्रत्येक काम मी योग्यरित्या पार पाडेन. मला जनतेची कामं करायची आहेत. त्यामुळे मिळतील त्या भूमिका मी पार पाडेन.
१५२ लक्षवेधी एका अधिवेशनात मांडण्यात आल्या. कामकाज वाढले. मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बदलले आहे. आम्ही पूर्ण डिजिटलाइज केलेले आहे. दोन्ही सभागृह आता पेपरलेस आम्ही करत आहोत. विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगले काम करण्याची संधी मिळाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आता सध्या तरी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही. कारण समोर महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे अशा वातावरणात ज्या त्या जिल्ह्यात असणाऱ्या मंत्र्यांना किंवा एखाद्या नेत्याला अस्थिर करण्याचे काम करतील असे मला वाटत नाही.
– सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते





