pune news : ‘आता विभागीय मंडळांवरही साक्षरता कार्यक्रमाची जबाबदारी’; राजेश क्षीरसागर यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती

पुणे – उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाची क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आता विभागीय मंडळांवरही कार्यक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
उल्लास नव भारत साक्षरता हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सन २०२२ ते २०२७ या कालावधीत देशभर राबवला जात आहे. राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी योजना शिक्षण संचालनालयाकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आढावा घेण्यात येतो व क्षेत्रभेटी देण्यात येतात. यातून क्षेत्रीय स्तरावर या कार्यक्रमाचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे.
या योजनेत निरक्षरांचे सर्वेक्षण व स्वयंसेवक सर्वेक्षण, त्यांची उल्लास अॉपवर ऑनलाइन नोंदणी व जोडणी, अध्ययन अध्यापन, परीक्षेचा सराव, परीक्षा पूर्व व परीक्षोत्तर कामकाजाची कार्यवाही तसेच क्षेत्रिय स्तरावरील जिल्हा, तालुका, शाळास्तर समित्यांचे कामकाज या बाबींचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक, डायट प्राचार्य, शिक्षणाधिकारी यांचा या योजने संदर्भातील कामकाजाचा आढावा, योजनेची प्रसिद्धी, उद्दिष्टानुसार केले काम याबाबत विभागीय समन्वयकांनाही आता लक्ष घालावे लागणार आहे.
चालू वर्षीची असाक्षर ऑनलाइन नोंदणी व त्यापुढील कार्यवाही सुरू आहे. इयत्ता आठवी व त्यापुढील शालेय विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या बैठकांमध्ये याचा आढावा घेण्याचे निर्देश विभागीय मंडळांना संचालकांनी दिले आहेत.
राज्य समन्वयक कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व विभागीय समन्वयकपदी रत्नागिरी मंडळ वगळता संबंधित विभागीय मंडळाच्या अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्तपणे जारी केले आहेत.
सध्या विभागीय अध्यक्ष म्हणून राजेंद्र अहिरे-मुंबई, डॉ. सुभाष बोरसे -नाशिक, मंजुषा मिसकर-पुणे, अनिल साबळे-छत्रपती संभाजी नगर, सुधाकर तेलंग-लातूर, नीलिमा टाके-अमरावती, माधुरी सावरकर-नागपूर हे काम पाहत आहेत. उल्लास योजनेतील अनुभव लक्षात घेता आदेशानुसार राजेश क्षीरसागर यांना राज्य समन्वयक, कोल्हापुर विभाग समन्वयक आणि रत्नागिरी विभाग समन्वयक म्हणून काम पहावे लागणार आहे.





