Pune District : आंबेगाव तालुक्यात जनगणनेचा पहिला टप्पा सुरू
Pune District : त्यानंतरच्या टप्प्यात १६ मे ते १४ जुलै या कालावधीत पुढील नियोजित प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मंचर : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रीय जनगणना २०२७ च्या अनुषंगाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात प्रगणक आणि पर्यवेक्षकांकडून घराघरात जाऊन माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३९४ प्रगणक घराघरात जाऊन माहिती संकलन करत आहे. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अचूक, संपूर्ण आणि खरी माहिती द्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांनी केले.
जनगणना प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १५ मे ते १५ जून या कालावधीत घरांची यादी तयार करणे तसेच गृहगणना केली जाणार आहे. या ३० दिवसांच्या कालावधीत नियुक्त कर्मचारी प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन कुटुंबांची माहिती, घराची स्थिती आणि आवश्यक नोंदी संकलित करत आहेत. त्यानंतरच्या टप्प्यात १६ मे ते १४ जुलै या कालावधीत पुढील नियोजित प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आंबेगाव तालुक्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये १ चार्ज अधिकारी, ४ चार्ज युजर, ८ क्षेत्र प्रशिक्षक, ६६ पर्यवेक्षक, ७ राखीव पर्यवेक्षक, ३९४ प्रगणक आणि ४० राखीव प्रगणक यांचा समावेश आहे. सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना जनगणना प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले असून ठराविक नमुन्यानुसार माहिती संकलनाचे काम सुरू आहे. या जनगणनेदरम्यान प्रगणकांकडून एकूण ३४ मुद्द्यांवरील माहिती संकलित केली जाणार आहे. त्यासाठी मोबाईल प्रणालीद्वारे माहिती नोंदविण्याची सुविधा वापरण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता, दुर्गम भागातील प्रवास आणि प्रत्यक्ष भेटी यामुळे कर्मचारी मोठ्या परिश्रमाने हे काम पार पाडत आहेत.
जनगणना ही विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता प्रगणकांना सहकार्य करावे आणि विचारण्यात येणारी माहिती अचूक स्वरूपात उपलब्ध करून द्यावी.
– डॉ. सचिन वाघ, तहसीलदार, आंबेगाव तालुका.
हेही वाचा : Pune District : मंचर बाजारात कांद्याचे लिलाव बंद





