Pune District : भाडेकरूंची पोलीस पडताळणी अनिवार्य
Pune District : सर्व घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात जमा करणे बंधनकारक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रांजणगाव गणपती : रांजणगाव एमआयडीसी परिसरात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे विविध राज्यांतून रोजगारासाठी येणार्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याने भाडेकरू पडताळणीची विशेष मोहीम सुरू केली असून, सर्व घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात जमा करणे बंधनकारक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, करडेलवाडी, बाभुळकर आदी परिसरात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यांतील हजारो कामगार वास्तव्यास आहेत. मात्र, अनेक ठिकाणी भाडेकरूंची ओळख, कायमस्वरूपी पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, काम करणार्या कंपनीची माहिती आदी तपशील न घेता खोल्या भाड्याने दिल्या जात असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. पोलीस प्रशासनाच्या मते, अशा निष्काळजीपणाचा गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना होण्याची शक्यता आहे.
चोरी, घरफोडी, महिलांवरील अत्याचार, अमली पदार्थांची तस्करी, मारामार्या तसेच इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती खोटी ओळख सांगून वास्तव्यास राहू शकतात. त्यामुळे प्रत्येक भाडेकरूची पोलीस पडताळणी करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात विशेष भाडेकरू माहिती फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला असून, घरमालकांनी तो भरून आवश्यक कागदपत्रांसह तातडीने सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासन लवकरच विविध गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन भाडेकरूंची पडताळणी करणार आहे. ज्या घरमालकांनी भाडेकरूंची माहिती लपवून ठेवली असेल किंवा आवश्यक माहिती न देता जागा भाड्याने दिली असेल, त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत असून, प्रभावी पोलिसिंगसाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाने नमूद केले आहे.
रांजणगाव एमआयडीसी परिसरातील उद्योगांची संख्या आणि स्थलांतरित कामगारांचे प्रमाण सातत्याने वाढत असताना, परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक घरमालकाने व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.
-कुमार कदम, पोलीस निरीक्षक रांजणगाव एमआयडीसी ठाणे





