Pune District : महामार्गावरील वाहतूक कोंडीवर संताप
Pune District : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भूसंपादनातील विलंबाची बाब स्पष्ट केली होती.

राजगुरुनगर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली टोलनाका या सुमारे 30 किलोमीटरच्या मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, प्रत्येक प्रमुख चौकात उड्डाण पूल उभारावेत तसेच पीएमआरडीएच्या आराखड्यातील बायपास रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, या प्रमुख मागण्यांसाठी आम आदमी पार्टी आणि रिपाइं (आठवले) श्रमिक ब्रिगेडच्या वतीने चाकण-तळेगाव चौकात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी सांगितले की, नाशिक फाटा ते चांडोली टोलनाका या मार्गाच्या रुंदीकरणास केंद्र शासनाने मंजुरी दिली असली, तरी आवश्यक जमिनीचे शंभर टक्के भूसंपादन राज्य शासनाकडून अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकलेली नसल्याने नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भूसंपादनातील विलंबाची बाब स्पष्ट केली होती. तसेच डिसेंबर 2026 पर्यंत भूसंपादन पूर्ण न झाल्यास मंजूर निधी रद्द होण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी व्यक्त केल्याचा उल्लेखही आंदोलकांनी केला. यावेळी आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले की, या मार्गावरील प्रमुख सिग्नल चौकांमध्ये उड्डाण पूल नसल्याने कामगार, विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतमाल वाहतूक करणारी वाहने आणि सर्वसामान्य नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. त्यामुळे रुंदीकरणाची कामे पूर्ण होईपर्यंत पीएमआरडीएच्या नियोजित बायपास रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली.
या मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत पाठविण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष स्वप्निल गायकवाड आणि रिपाइं (आठवले) श्रमिक ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस यांनी वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या विलंबाबद्दल प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. आंदोलनाच्या शेवटी वाहतूक कोंडीमुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आंदोलनादरम्यान चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.





