Pune District : नागरिक ठरले पोलिसांचे खरे सहकारी
Pune District : त्यानंतर कोरेगाव भीमा आठवडा बाजारात जावेद अजिज सय्यद आणि लुकमान सुलेमान सय्यद (रा. शिरूर) यांना नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ताब्यात घेऊन त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरेगाव भीमा : शिक्रापूर पोलीस ठाण्याने शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि तळेगाव ढमढेरे येथील आठवडा बाजारांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. गेल्या दीड महिन्यात सातत्यपूर्ण गस्त, जनजागृती आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्क सहकार्यामुळे सात चोरट्यांना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून मदत करणार्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांनी विशेष सन्मान केला.
आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेत मोबाईल, दागिने आणि रोकड चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष पथके तैनात केली होती. ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सतत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शिक्रापूर आठवडा बाजारात सारिका राजू जाधव आणि साक्षी मेघराज पवार (रा. मांतरवाडी, हडपसर) यांना चोरी करताना रंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कोरेगाव भीमा आठवडा बाजारात जावेद अजिज सय्यद आणि लुकमान सुलेमान सय्यद (रा. शिरूर) यांना नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ताब्यात घेऊन त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, गुरुवारी कोरेगाव भीमा आठवडा बाजारात गस्तीदरम्यान मालन सहदेव पवार, रेखा गणेश दगडे आणि सायली कार्तिक दगडे (सर्व रा. वाघोली) या तिघींना चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत स्थानिक नागरिकांनी संशयितांवर लक्ष ठेवणे, पोलिसांना तातडीने माहिती देणे आणि कारवाईत सहकार्य करणे अशी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेची दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सुरेश भांडवलकर, दिनेश भोरे, साईनाथ शिनगारे (सर्व रा. कोरेगाव भीमा), सिकंदर शेख, रियाज शेख (दोघे रा. शिक्रापूर) तसेच इतर सहकार्य करणार्या नागरिकांना शिक्रापूर पोलीस ठाण्यात पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी गोपनीय अंमलदार संदीप कारंडे, श्रावण गुपचे, सुरेंद्र सरोदे, अजिंक्य कुदळे आदी उपस्थित होते.





