Dhananjay Munde : बंजारा समाजाला आरक्षण दिल्याशीवाय लढा थांबणार नाही; धनंजय मुंडेंचा आक्रमक पवित्रा

बीड : हैदराबाद गॅझेटमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, त्यामुळे सरकारनं बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीतून अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं. जोपर्यंत बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, मी नेहमी पाठीशी उभा असेन, असं विधान धनंजय मुंडे यांनी केलं आहे. बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे यासाठी बीडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धनंजय मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करून करुन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं. हा बंजारा समाज तेलंगणात, राजस्थानात आणि देशभरात अनुसूचित जमाती प्रवर्गात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार या बाबतीत विचार करेल, तसा प्रयत्न मी करणार आहे. हा माझा वैयक्तिक लढा आहे, असं धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना म्हणाले, हैदराबाद गॅझेटमध्ये वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळं आरक्षण आहे. त्यानुसार आता आधीचे एसटी आणि नव्याने येऊ घातलेले एसटी यांचा मेळ घालावा, त्याचा अभ्यास करावा. त्यानुसार संविधानाच्या चौकटीत बसवून आरक्षण द्यावं, बंजारा आणि वंजारी वेगवेगळे आहेत का? हे दोन्ही समाज एकच आहेत असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
माझ्या सारखा नशिबवान मीच
माझ्या सारखा नशिबवान मीच आहे. मी आज मंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं. मंत्री नाही म्हणून येता आलं. आज महाराष्ट्रातल्या मराठा, धनगर आणि इतर वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासोबत आता बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईतही मला उभा राहता येतं, त्यामुळे मी नशिबवान आहे. प्रत्येक मोर्चामध्ये मी तुमच्यासोबत आहे. बंजारा समाजाला जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला.
बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन
बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील मुरूम गावातील 32 वर्षीय तरुण पवन गोपीचंद चव्हाण याने आत्महत्या केली. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नाईक नगर येथील राहत्या घरी त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मयताच्या खिशात सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळावे, असा आशय होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




