‘बंजारा समाजाच्या अडचणी दूर करण्याला प्राधान्य’ – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

नवी दिल्ली – बंजारा समाज हा संस्कृती आणि संस्कार जपणारा आहे. माझ्या मतदार संघात या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून यांच्या प्रश्नांची मला जाण आहे. या समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करेल, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संत सेवालाल यांची 286 वी जयंती कार्यक्रमाप्रसंगी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय सभागृहामध्ये शुक्रवारी संत सेवालाल चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने बंजारा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत संत सेवालाल यांची 286 वी जयंती आणि रूप सिंग महाराज जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
बिर्ला म्हणाले, संत सेवालाल यांनी मानवतेसाठी संदेश दिला आहे. भारतीय संस्कृती आणि संत पंरपरेला जगले आणि जगविले. हा समाज मोठ्या प्रमाणात आधी जंगलात राहायचा. पर्यावरण संवर्धानाचे काम या समाजानेच केले आहे. स्वत:च्या गरजा सीमित ठेवून निर्सगाला वाढविण्याचे काम या समाजाने केले.
राजस्थानमधील कोटा या आपल्या मतदार क्षेत्रात बंजारा समाजाची संख्या मोठी असल्याचे सांगत बिर्ला म्हणाले, त्यांच्या अडचणींची जाण आहे. बंजारा समाजाची बोलीभाषा, खानपान, वेशभुषा एक समान असूनही वेगवेगळया राज्यात वेगवेगळया वर्ग घटकात हा समाज मोडतो. त्याचा अभ्यास करून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
अमृता फडणवीस यांना बंजारा कला रत्न
गायीका, सामाजिक कार्यकर्ती म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांना बंजारा कला रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांचे गुणगाण करणाऱ्या गाण्यांवर आधारित अल्बमध्ये मारो दवे सेवालाल…. हे गीत गायले तसेच अभिनयही केला. त्यांचे हे गाणे बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय ठरत आहे.





