प्रभात वृत्तसेवा पुणे – भवानी पेठेतील कासेवाडीत तोतया डाॅक्टरला पोलिसांनी अटक केली. गेली ३२ वर्ष तो वैद्यकीय पदवी नसताना दवाखाना चालवत होता. मे महिन्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर तो फरारी झाला होता.डाॅ. प्रमोद राजाराम गुंडू ( ५७) असे त्याचे नाव असून त्याने कोणताही वैद्यकीय अभ्यासक्रम केला नव्हता. तसेच वैद्यकीय परिषदेकडेही त्याची नोंदणी केली नव्हती. याची माहिती मिळाल्यावर महापालिकेच्या आरोग्य पथकाने कारवाई करून २ मे रोजी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुंडू याने शिवाजीनगर न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो नामंजूर केला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तेथेही त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. त्यानंतर तो पसार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. खडक ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे आणि पथकाने त्याला ताब्यात घेतले. गुंडूला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. फरारी झाल्यानंतर तो कुठे गेला, तसेच त्याला कोणी आश्रय दिला ? हा तपास करायचा असल्याने सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (१० नोव्हेंबर) पोलीस कोठडी दिली.बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध पालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी आरोग्य विभागाने वारजे, कात्रज भागात कारवाई करुन तोतया डाॅक्टरांना पकडले होते. लोणी काळभोरमध्ये एका कपांऊंडरने (मदतनीस) दवाखाना सुरू केला हाेता. त्यालाही अटक करण्यात आली होती.