सांगली : सांगलीच्या तासगावमध्ये येत्या ९ नोव्हेंबर रोजी देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत रंगणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना (शिंदे गट) नेते चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने “श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत” भव्य दिमाखात आयोजित केली जात आहे. या मेगा सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील मार्गदर्शनासाठी उपस्थित राहतील. शर्यतीसाठी राज्यभरातून चार ते पाच लाख शेतकरी बांधव आणि नामांकित गाडीधनी सहभागी होणार आहेत. या शर्यतीच्या विजेत्यांसाठी चंद्रहार पाटलांकडून फॉर्च्युनर, थार आणि तब्बल १५० बाईक अशी भव्य बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. तासगावचा घाट आणि शर्यतीचा जल्लोष पाहण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्हा सज्ज झाला असून, या सोहळ्यामुळे ग्रामीण क्रीडा परंपरेला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.