Bigg Boss Marathi 7 : ‘बिग बॉस मराठी ७’मध्ये कोणाची लागणार वर्णी? ‘या’ कलाकारांची नावे चर्चेत; व्हायरल पोस्टने वाढवली उत्सुकता
विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये लोकप्रिय गायक, यूट्यूबर, कॉमेडियन आणि अभिनेत्यांची नावे झळकत आहेत.

Bigg Boss Marathi 7 : छोट्या पडद्यावर मनोरंजन, वाद, रुसवे-फुगवे, मैत्री आणि अनपेक्षित ट्विस्टचा तडका देणारा लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’! या शोमधील स्पर्धकांची भांडणं असोत, टास्कदरम्यान रंगणारी चुरस असो किंवा घरातील नात्यांमधील बदल, प्रत्येक गोष्टीची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा रंगत असते.
सहाव्या पर्वाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर आता सातव्या पर्वाचे वेध चाहत्यांना लागले आहेत. ‘बिग बॉस मराठी ७’मध्ये यंदा कोणते चेहरे पाहायला मिळणार? कोण घरात प्रवेश करून आपल्या खेळाने प्रेक्षकांची मनं जिंकणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
त्यातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टने या चर्चांना आणखी हवा दिली आहे. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये लोकप्रिय गायक, यूट्यूबर, कॉमेडियन आणि अभिनेत्यांची नावे झळकत आहेत. त्यामुळे यंदाच्या पर्वात संजू राठोड, प्रणित मोरे आणि आकाश ठोसर यांसारखे चेहरे दिसणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या नावांबाबत अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.
‘बिग बॉस मराठी ७’ कधी सुरू होणार?
‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले १९ एप्रिल २०२६ रोजी पार पडला होता. अभिनेता रितेश देशमुख याने या पर्वाचे सूत्रसंचालन केले होते. या पर्वात अभिनेत्री तन्वी कोलते हिने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर राकेश बापट उपविजेता ठरला होता. तब्बल ९९ दिवसांच्या या प्रवासात स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
सहाव्या पर्वाची सांगता झाल्यानंतर आता चाहत्यांना सातव्या पर्वाची प्रतीक्षा आहे. मात्र, ‘बिग बॉस मराठी ७’चा प्रीमियर नेमका कधी होणार, याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.
अशातच सोशल मीडियावर सातव्या पर्वासंदर्भातील एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सातव्या पर्वाचे संकेत देतानाच संभाव्य स्पर्धकांचे फोटो आणि नावेही शेअर करण्यात आली आहेत. त्यामुळे ही नावे पाहून चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
कोणत्या कलाकारांची नावे चर्चेत? संजू राठोड, प्रणित मोरे ते आकाश ठोसर!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये ‘बिग बॉस मराठी ७’साठी काही लोकप्रिय चेहऱ्यांची नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध यूट्यूबर आणि गेमर श्रीमान लेजंट, लोकप्रिय गायक संजू राठोड, विवेक रुपेश, मनोज पाटील, कॉमेडियन प्रणित मोरे, अभिनेता आकाश ठोसर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व अभिनेता विनायक माळी यांच्या नावांचा समावेश आहे.
या संभाव्य यादीमध्ये विविध क्षेत्रांतील लोकप्रिय व्यक्तींचा समावेश असल्याने चाहत्यांचे लक्ष वेधले जात आहे. संजू राठोड याच्या गाण्यांची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. दुसरीकडे, प्रणित मोरे आपल्या विनोदी शैलीमुळे ओळखला जातो. आकाश ठोसरने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर विनायक माळी आपल्या हटके विनोदी व्हिडीओ आणि सोशल मीडिया कंटेंटमुळे लोकप्रिय आहे.
त्यामुळे या कलाकारांपैकी कोणी प्रत्यक्षात बिग बॉसच्या घरात प्रवेश केला, तर घरातील समीकरणे कशी बदलणार, कोणाची मैत्री जमणार आणि कोणामध्ये वादाची ठिणगी पडणार, याबाबत चाहत्यांमध्ये आतापासूनच तर्कवितर्क लढवले जात आहेत.





