Satej Patil : “गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचा डाव..”; सतेज पाटील यांचा मोठा आरोप
सतेज पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचा डाव आहे.

Satej Patil – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून घमासान रंगले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला रोखण्यासाठी महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून, गोकुळ दूध संघावर चार शासननियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे.
सतेज पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचा डाव आहे. राज्यातील लोकशाही व्यवस्था हाणून पाडण्याच काम सरकार करत आहे.
हसन मुश्रीफ यांच्यासोबत आता दोस्ती कुठली? त्यांनी गद्दीरी केली. तुम्ही बॅक डोअर एन्ट्री केली. अमूलमध्ये सुध्दा असेच संचालक नेमण्यात आले होते. परंतु हायकोर्टाने ते नाकारले. जनतेने तुम्हाला नाकारले आहे, उत्पादकांनी तुम्हाला नाकारले आहे, असेही पाटील यांनी म्हटले.
गोकुळमध्ये 4 शासकीय सदस्य आणि एक शासकीय सदस्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. 4 अशासकीय सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर सतेज पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोकुळसाठी आता रस्त्यावर उतरणार आहे.
आगामी 9 नोव्हेंबरला कोल्हापुरमधील दसरा चौक येथून जिल्हा कार्यालयावर मोर्चा काढणार आहे, अशी घोषणा सतेज पाटील यांनी केली आहे. निवडणुकीत समविचारी आघाडीला 25 पैकी 13 जागा तर महायुतीकडे 12 जागा आहेत.
मात्र अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक कोरम दोन्ही पक्षांकडे नाही. मात्र 4 शासकीय सदस्यांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार मिळाल्यास महायुतीचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. दरम्यान मंजुरीची ही फाईल राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी दाखल झाली असून, यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
याचदरम्यान, निकाल तुमच्या बाजूने लागला नाही म्हणून कायदा बदलता. निवडणुकीच्या अगोदर गोकुळमध्ये कायदा बदलायला पाहिजे होता. तज्ज्ञ संचालक नेमावे असे म्हणत आहे, ज्यांना मतदारांनी नाकारले आहे, त्यांना तज्ज्ञ म्हणत आहेत. तज्ज्ञ असते तर लोकांनी त्यांना नाकारले नसते. आमचा कायदेशीर लढा सुरूच आहे, असे सतेज पाटील यांनी सांगितले.






