पुणे जिल्हा | विषमुक्त शेती आणि विषमुक्त परसबाग ही संकल्पना राबवावी

घोडेगाव, (वार्ताहर) – परसबागेच्या माध्यमातून महिलांनी कोणत्याही रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर करू नये. त्या माध्यमातून कॅन्सल सारख्या दुर्धर आजाराचा सामना करण्याची वेळ येणार नाही.
यासाठी विषमुक्त शेती आणि विषमुक्त परसबाग ही संकल्पना राबवावी, असे आवाहन टाटा मोटर्स समाजविकास विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक लितेश अत्तारदे यांनी केले.
यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगाव व टाटा मोटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व तिच्या कुटुंबाचे आरोग्य चांगले रहावे.
म्हणून “माझी पोषण परसबाग” ही विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. आहारात विविध प्रकारचा विषमुक्त भाजीपाला आला तर आरोग्यावर होणारा खर्च कमी करून आर्थिक बचत व्हावी.
तसेच लहान मुलांचे कुपोषण दूर व्हावे. यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार घोलप यांनी दिली.
गंगुबाई बोऱ्हाडे यांनी पूर्वीच्या काळात सकाळी पहाटे लवकर उठून जात्यावर पीठ दळून व दगडी पाट्यावर वाटला जाणाऱ्या मसाल्याचे आणि आताचे वेगळेपणाबाबत माहिती दिली.
यावेळी चपटेवाडीच्या सरपंच शकुंतला धादवड, यशवर्धिनी संघाच्या अध्यक्ष योगिता बोऱ्हाडे, मैना चपटे, आशा बोऱ्हाडे, सरला शेळके, मेघा बोऱ्हाडे, अनिता आनंदराव, छाया चपटे, मीना धादवड, सविता चपटे, लता अंभिरे,संगीता चपटे, सुनंदा धादवड आदी बचत गटांतील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना एरंडे, सुहास वाघ, शिवाजी शेटे, हरिभाऊ गेंगजे परिश्रम घेत आहेत. परसबाग फुलविताना कोणत्याही रासायनिक औषधांचा वापर न करता पारंपरिक खते व औषधे म्हणजेच जीवामृत, घनामृत, दशपर्णी अर्क, निम अर्क, गांढूळ खत याचा आधार घेतला जाणार आहे.
कोट : यशवर्धिनी संस्था व टाटा मोटर्सच्या माध्यमातून लोकांच्या आहारात विषमुक्त भाजीपाला वाढविण्याचा या मोहिमेतून प्रयत्न केला जाणार आहे. उत्कृष्ट परसबागसाठी प्रोहोत्सान म्हणून अनुक्रमे ५ हजार १ रुपये, ४ हजार १ रुपये,३ हजार १ रुपये, अशी रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. – कुमार घोलप, मुख्य कार्यकारी अधिकारी, यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ, आंबेगाव.





