nagar | घोडेगावात अवैध धंद्याना सुगीचे दिवस

सोनई, (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील घोडेगाव अवैध धंद्यांचे माहेरघर बनले आहे. नगर-संभाजी नगर रोडवर असलेले हे गाव कांदा मार्केट व जनावरांच्या बाजारासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या भागात राजरोसपणे चौकाचौकात गावठी दारू विक्री, मटका, जुगार, गावठी कट्ट्यांची विक्री सुरू असून पोलिसांचा याला छुपा आशिर्वाद असल्याने गुन्हेगारांचे फावले आहे.
घोडेगावच्या बाजारात आल्यावर आपले वाहन पार्किंगमध्ये लावून सुध्दा ते सुरक्षित राहील की नाही, याची शाश्वती देणे देखील नाही. यापूर्वी देखील दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. परंतु पोलिसात जाऊन काही उपयोग नाही.
तपास लागत नसल्याने नको तो डोक्याला ताप म्हणून फिर्याद देण्यासाठी कुणी धजत नाही. तसा विचार केला तर घोडेगावसाठी स्वतंत्र पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली मात्र या चौकीचा कारभार सध्या झिरो पोलिसांच्या हाती आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय बोकाळले आहे. पांढरी पूल ते घोडेगाव दरम्यान दिवसा दुचाकी तर रात्री मोठमोठ्या गाड्यांना गावठी कट्यांचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार सुरू आहे.
पांढरी पूल येथे अनेक हाॅटेलवर वेश्याव्यवसाय, गाड्यातील डिझेल चोर, सिमेंट चोर, लोखंडी सळ्या चोरीचे अनेक प्रकार या ठिकाणी घडत असतात. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी या ठिकाणी पोलीस चौकीची उभारणी केली खरी परंतु एकही पोलीस या चौकीत उपस्थित नसल्याने तक्रारदाराला तक्रार देण्यासाठी थेट दहा किलोमीटर सोनई या ठिकाणी यावे लागते. त्यातच येऊन आपल्याला न्याय मिळेल किंवा नाही याची खात्री नाही.
शुक्रवार जनावरांचा मोठा बाजार असल्याने या ठिकाणी परराज्यातून व्यापारी येत असतात. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते . या कोंडीचे पोलिसांना काही सोयरसुतक नाही. झिरो पोलिसांच्या मदतीने वाहने अडवून त्यांचेकडून चिरीमिरी वसुली होत आहे.
या सर्वासाठी संबधित पोलीस यंत्रणाच या ठिकाणी असलेले बीटअंमलदारच जबाबदार आहेत. वेळीच पोलीस खाक्या दाखवला तर या सर्वांना आळा बसेल. मात्र, तसे होताना दिसत नाही. रात्रीच्या वेळी घोडेगाव ते पांढरीपल दरम्यान व घोडेगाव ते नेवासा फाटा दरम्यान अनेक हॉटेल आहेत परंतु या हॉटेलमधून काय व्यवसाय चालत असतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही,याला पोलीस यंत्रणेचाच छुपा आशीर्वाद आहे. देशी-विदेशी दारूचा महापूर आलेला दिसून येतो. पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यास वेळ मिळत नाही.
.





