Share Market Fraud – घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे शेअर मार्केटिंगच्या नावाखाली नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपी सिध्देश मनोज काळे वय ३७ (रा.कोलदरे, ता.आंबेगाव) याला घोडेगाव पोलिसांनी अखेर अटक केली आहे. सुमारे वर्षभर फरार असलेल्या या आरोपीला तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे नवी मुंबई परिसरातून जेरबंद करण्यात आले. त्याच्यावर घोडेगाव पोलीस ठाणे येथे विविध कलमांनुसार तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सिध्देश मनोज काळे वय ३७ (रा. कोलदरे, ता.आंबेगाव) याच्यासह गणेश दत्तात्रय गव्हाणे (रा.साल बाबुळवाडी ता.आंबेगाव), राहुल दिलीप काळे (रा.शिंदेवाडी) आदी आरोपींचा समावेश आहे. आरोपींनी संगनमताने ‘इडलवाईज ब्रोकिग लिमिटेड’ या कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना वार्षिक जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. शेअर मार्केट फसवणूक (संग्रहित फोटो) त्यातून सुमारे २ कोटी ९४ लाख ६३ हजार ८०१ रुपयांची फसवणूक करून ती रक्कम अपहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी सिध्देश मनोज काळे हा फरार झाला होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी त्याने विविध ठिकाणी वास्तव्य बदलले. पोलिसांनी त्याचा सतत शोध घेतला; मात्र तो हाती लागत नव्हता.अखेर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नवी मुंबई परिसरात असल्याचे समजताच पोलीस पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असून गुन्ह्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार,पोलीस उपनिरीक्षक महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून महिला पोलीस हवालदार मनीषा तुरे यांच्यासह पथक कार्यरत आहे. फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे दरम्यान, घोडेगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या प्रकरणातील आरोपींकडून फसवणूक झाली असल्यास पुढे येऊन माहिती द्यावी. अधिक पीडित पुढे आल्यास गुन्ह्याचा तपास अधिक व्यापक होण्यास मदत होणार आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.