Nagar | त्या माथेफिरू अधिकाऱ्याची तक्रार थेट डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे

राहुरी, (प्रतिनिधी): नगर येथे विधानपरिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनच्या उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे या लाडकी बहिण योजना सन्मान योजनेच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख अॅड. उज्वला भोपळे,
नगर दक्षिण जिल्हा प्रमुख डॉ.शबनम इनामदार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीच्या राहुरी तालुका प्रमुख वनिता जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने भेट घेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी सहायकाच्या अश्लील वागणुकीविषयी तक्रारीचा पाढा वाचत तक्रार अर्ज दिला आहे.
राहुरी विद्यापीठात दहा ते बारा महिला गेल्या १३ वर्षापासून द्राक्ष विभागात काम करत होत्या. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून द्राक्ष विभागाकडे नव्याने बदलून आलेले कृषी सहाय्यक हे महिलांसोबत अश्लील स्वरूपाच्या गप्पा मारून शरीर सुखाची मागणी करीत होता.
परंतु कामावरील महिलांनी कोणतीही दाद न दिल्याने नव्याने आलेल्या मजूर ठेकेदाराला कृषी सहाय्यक याने सर्व कामगार महिलांसमोर सांगितले की “या सगळ्या कामावरील बायका बंद करून मला माझ्या पसंतीच्या काही मोजक्या बायका माझ्या कामावर घेऊन येत या, या सगळ्या बायका बंद करा.” असे सांगितल्यामुळे ठेकेदाराने दहा-बारा कामगार महिलांना कामावरून काढून टाकले आहे.
पीडित महिलांनी कुलसचिव यांच्याकडे तक्रार केली होती.परंतु एक महिना उलटला तरीदेखील कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. सबंधित विकृत मनोवृत्ती असलेल्या कृषी सहाय्य याला तत्काळ निलंबित करून महिलांना कामावर घेण्याची मागणी डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे करण्यात आली.





