Shani Shingnapur Railway : शनिभक्तांसाठी गुड न्यूज! राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वेला मंजुरी; पाहा कसा आहे मार्ग
Shani Shingnapur Railway : शनि शिंगणापूरच्या पर्यटनाला मिळणार नवी झळाळी; रेल्वे प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी उर्जितावस्था येण्याची शक्यता, अधिसूचना प्रसिद्ध.

Shani Shingnapur Railway – रेल्वे मंत्रालयाने शनिभक्तांसाठी राहुरी ते शनि शिंगणापूरला जोडणार्या नवीन रेल्वेमार्गाच्या निर्मितीला मंजुरी दिली असून, 21.84 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग 494.13 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. दरम्यान, या रेल्वे मार्गासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, जमीन अधिग्रहण प्रक्रियेला वेग आला आहे.
एकीकडे बेलापूर – परळी रेल्वे मार्गासाठी रेल्वे कृती समितीकडून या मार्गासाठी उपोषण करण्यात आलेले असताना दुसरीकडे राहुरीहून शनी शिंगणापुरात आता रेल्वे धावणार असल्यामुळे दळणवळण आणि आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग अखेर मोकळा झाल्यामुळे या रेल्वे मार्गाचे शनिभक्तांकडून मोठे स्वागत करण्यात येत आहे.
राहुरी – शनीशिंगणापूर या रेल्वेमार्गासाठी शनिशिंगणापूर आणि सोनईतील काही जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या रेल्वेसाठी ज्या शेतकर्यांच्या जमिनी जाणार आहे, त्यांची नावे, गट नंबर आणि अन्य विवरणही जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे काही आक्षेप असतील तर त्यांना त्यासाठी मुदतही देण्यात आलेली आहे.
शनि शिंगणापूर हे देशातील जगप्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे दररोज 30 ते 45 हजार भाविक भेट देतात, मात्र या तीर्थस्थळासाठी थेट रेल्वे जोडली गेलेली नव्हती. या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे भाविकांना आता थेट सुखकर प्रवास सुलभ होणार आहे. राहुरी व परिसरातील आजूबाजूच्या तसेच राज्याच्या कान्याकोपऱ्यातून यात्रेकरू, भाविकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
तीर्थक्षेत्र नेवासे तालुक्यात येणाऱ्या या रेल्वेमुळे साईबाबांची शिर्डी, राहुरीतील राहू-केतू मंदिर आणि नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिर ,मोहिनीराज मंदिर, कारवीरेश्वर मंदिरे यासारख्या अन्य धार्मिक तीर्थस्थळांपर्यंत भाविकांना प्रवास करता येणार आहे. परिणामी या रेल्वेमार्गामुळे स्थानिक पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी उर्जितावस्था येणार आहे.
या रेल्वेमार्गावर तयार करण्यात आलेल्या तपशीलवार अहवालानुसार दररोज चार प्रवासी गाड्या चालवण्याचे नियोजन असून, यामुळे दरवर्षी 18 लाख प्रवासी प्रवास करतील, असा प्राथमिक अंदाज आहे. शनि शिंगणापूरसारख्या महत्त्वाच्या आध्यात्मिक केंद्रासाठी ही रेल्वे सुविधा उभारणी आणि रेल्वे जोडणी हे एक धार्मिक तीर्थस्थळासाठी मोठी पर्वंणी ठरणार असल्यामुळे या रेल्वेमार्गाचे जनतेतून मोठे स्वागत केले जात आहे.





