Indian Army bomb disposal : राहुरीत फाइटर जेटमधून पडला भला मोठा बॉम्ब; तब्बल एक महिन्यांनी केला निकामी

अहिल्यानगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात फायटर जेटमधून पडून जमिनीमध्ये सात फुटांवर रूतून बसलेला जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी करण्यात आला. यासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. या सुचनांची दखल घेत लष्कराकडून १ मे रोजी हा बॉम्ब निकामी करण्यात आला.
वरवंडी येथे फायटर विमानातून हा बॉम्ब पडून जमीनीमध्ये रूतल्याने शेतकऱ्यांच्या जल वाहिन्या फुटल्या. त्यामुळे शेतांमधील पीके जळण्याची वेळ आली होती. सात दिवस उलटूनही बॉम्ब हटविण्यासंदर्भात काहीही कार्यवाही झाली नव्हती. खासदार नीलेश लंके यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी स्टेशन कमांडर आणि लष्करी अधिकाऱ्यांसमवेतबैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याचे निर्देश दिले होते.
१ मे रोजी लष्करी तज्ञांच्या पथकाने हा जिवंत बॉम्ब सुरक्षितपणे काढून तो आपल्या ताब्यात घेतला. हा बॉम्ब निकामी असल्याची माहीती स्टेशन कमांडर यांनी खा. लंके यांना दिली. हा बॉम्ब निकामी करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांना तसेच नागरीकांना मोठा दिलासा मिळाला.





