Wireman Death : ताहाराबाद शिवारातील गाडकवाडी येथे विजेची नवीन वायर ओढण्याचे काम सुरू असताना सिमेंटचा खांब तुटून खासगी वायरमनच्या अंगावर पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत वायरमनचे नाव महेंद्र अर्जुन विधाटे (वय ३३, रा. म्हैसगाव) असे असून ते खासगी स्वरूपात वायरमनचे काम करत होते. ताहाराबाद शिवारातील गाडकवाडी येथील जगताप वस्तीवर सुमारे चार महिन्यांपूर्वी विजेचे सिमेंटचे खांब उभारण्यात आले होते. या खांबांवर नवीन वीजवाहिनीची वायर ओढण्याचे काम सुरू होते. यासाठी महेंद्र विधाटे आणि पाराजी तळपे हे दोघे खासगी वायरमन कामासाठी गेले होते.पण काम सुरू असताना महेंद्र विधाटे हे वायर ओढण्यासाठी संबंधित सिमेंटच्या खांबावर चढले. मात्र, खांब निकृष्ट दर्जाचा असल्याचा संशय व्यक्त होत असून तो अचानक मधोमध तुटला. त्यामुळे महेंद्र थेट शेतातील खड्यात कोसळले. याचवेळी तुटलेला खांबही त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांना शरीराच्या आतून गंभीर दुखापत झाली. घटनेचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या महेंद्र यांना तातडीने त्यांचे भाऊ रोहित विधाटे व नातेवाईकांच्या मदतीने फॅक्टरी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. महेंद्र यांच्या शरीरावर बाह्य स्वरूपाच्या मोठ्या जखमा स्पष्टपणे दिसत नसल्याने मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी मृतदेह लोणी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित सिमेंटचा खांब अवघ्या चार महिन्यांत कसा तुटला? असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. कंत्राटदार, खांब उत्पादक कंपनी तसेच कामावर देखरेख करणाऱ्या यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, सखोल चौकशीची मागणी होत आहे. महेंद्र विधाटे यांच्या पश्चात चार भाऊ, आई-वडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.