बोट बंद पडल्याने अडकलेल्या २६ जणांची तटरक्षक दलाने केली सुटका

पणजी – भारतीय तटरक्षक दलाने गोव्यातील मुरगाव बंदराजवळ एका पर्यटक फेरी बोटीत अडकलेले २४ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्सची सुटका केली आहे. तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
नेरुळ पॅराडाईज ही बोट खडबडीत हवामानामुळे आणि उसळत्या लाटांमुळे समुद्रात अडकली होती. लाटा तीन मीटरपेक्षा जास्त उंचीच्या होत्या त्यातच या बोटीचे इंधन संपले हेाते. त्यामुळे ती समुद्रातच अडकून पडली होती.
पणजी येथून पहाटेच्या वेळी ही बोट पर्यटकांसह समुद्र पर्यटनाला निघाली होती. गस्तीवरून परतणाऱ्या कोस्ट गार्ड जहाजाच्या कर्मचाऱ्यांना प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्याची चिन्हे जाणवली आणि त्यांनी त्वरित प्रतिसाद दिला, आणि या बोटीतील सर्वांची सुखरूप सुटका केली.
तटरक्षक दलाने संभाव्य आपत्ती टाळून बोट सुरक्षितपणे बंदरात आणली. आगमनानंतर, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना वैद्यकीय मदत देण्यात आली, असेही संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.




