‘#IPL2022’ च्या समारोप सोहळ्यात भारतीय क्रिकेटच्या 7 दशकांचा उलगडणार इतिहास

नवी दिल्ली – आयपीएल-2022’चा हंगाम अखेरच्या टप्प्याकडे वळत असून स्पर्धेत 20 पेक्षा कमी सामने बाकी आहेत. यामुळे आता सर्वांनाच अंतिम सामन्याची ओढ लागली आहे. आयपीएल 2022 हंगामतील अंतिम सामना 29 मे रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान, यंदा आयपीएलचा समारोप समारंभ मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे.
भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ (बीसीसीआय) भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त समारोप समारंभात कार्यक्रम आयोजित करणार असल्याचीही चर्चा आहे. सध्या भारतीय सरकार “आझादी का अमृत महोत्सव’ नावाने अनेक कार्यक्रम आयोजित करत आहे. त्यानुसार बीसीसीआय देखील भारतीय क्रिकेटचा इतिहास आयपीएलच्या समारोप समारंभातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच असेही समोर येत आहे की, भारताच्या माजी कर्णधारांना देखील या सोहळ्यासाठी पाहुणे म्हणून बोलावले जाऊ शकते.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, या कार्यक्रमात भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिनही साजरा केला जाणार आहे. तसेच या कार्यक्रमात भारतीय क्रिकेटने गेल्या 7 दशकांत साधलेला प्रवास पाहणार आहोत. अहमदाबादमधील अंतिम सामन्यासह, आम्ही एका खास शोद्वारे भारतीय क्रिकेट प्रवासाचे प्रदर्शन करून देशाच्या 75 व्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करू, असे त्याने सांगितले.
यंदा स्पर्धेतील प्लेऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबाद या दोन ठिकाणी होणार आहेत. प्लेऑफला 24 मे पासून सुरुवात होईल. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर हे दोन सामने अनुक्रमे 24 आणि 25 मे रोजी कोलकाता येथे होणार आहेत, तर क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना अनुक्रमे 27 आणि 29 मे रोजी अहमदाबादला होणार आहे.
दरम्यान, बीसीसीआयने इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना 29 मे रोजी शानदार समारोप समारंभ आयोजित करण्यासाठी बोली लावण्याची विनंती केली होती. यंदाचा आयपीएल समारोप बीसीसीआयला खास बनवायचा आहे. कारण गेले दोन वर्षे करोनाच्या सावटाखाली आयपीएल सर्वाधिक भारताबाहेर खेळले गेले होते.
रणवीर सिंह करणार परफॉर्म
या सोहळ्यात ऑस्कर विजेता संगतीकार आणि गायक ए. आर. रेहमान (ठरहारप) आणि अभिनेता रणवीर सिंह परफॉर्म करणार आहेत. दरम्यान, अद्याप समारोप समारंभाचे पूर्ण तपशील तयार होत आहे. गेले तीन वर्षे आयपीएलमध्ये उद्घाटन सोहळा आणि समारोप समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता, पण यावेळी समारोप सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे.





