R Ashwin on Sarfaraz Khan : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा केली, मात्र यामध्ये २८ वर्षीय सर्फराझ खानला स्थान मिळाले नाही. सर्फराझने आपल्या शेवटच्या कसोटी मालिकेत भारतासाठी शतक ठोकले होते आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. या निर्णयामुळे भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आर अश्विनचा संताप – आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला, “सर्फराझच्या निवड न होण्यामागील कारण मला समजत नाही. मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटतं. मी जर निवडकर्ता असतो, तर त्याला काय सांगितलं असतं? त्याने आपलं वजन कमी केलं आहे, तो सातत्याने धावा करतोय, त्याने मागील कसोटी मालिकेत शतकही ठोकलं आहे. तरीही त्याची निवड न होणं म्हणजे असं वाटतं की कुणीतरी ठरवलं आहे की, आता आपल्याला तो नको आहे. जर मी सर्फराझ असतो, तर मला असंच वाटलं असतं की माझ्यासाठी दरवाजे बंद झाले आहेत.” आता सर्फराझ कुठे चांगली कामगिरी करणार? अश्विन पुढे म्हणाला, “आता सर्फराझ कुठे चांगली कामगिरी करणार? जर तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावा करेल, तर लोक म्हणतील की तो फक्त प्रथम श्रेणी क्रिकेटसाठीच चांगला आहे. भारत अ मध्ये त्याची निवड होत नाही, मग तो आपली पात्रता कुठे सिद्ध करणार? हा निर्णय असा दिसतो की व्यवस्थापन किंवा निवड समितीने ठरवलं आहे की आता त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही.” हेही वाचा – IND vs AUS : फलंदाज की गोलंदाज, अॅडलेडमध्ये कोणाचे वर्चस्व, दुसऱ्या सामन्यात खेळपट्टी आणि हवामान कसे असेल? सर्फराझचा अलीकडील फॉर्म – सर्फराझने आपला शेवटचा प्रथम श्रेणी सामना मुंबईकडून जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्याने ४२ आणि ३२ धावांच्या खेळी केल्या. याशिवाय, इंग्लंड लायन्सविरुद्ध त्याने ९२ धावांची दमदार खेळी केली होती. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्फराझने १५० धावांची शानदार खेळी केली होती. या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आलं असून, सर्फराझच्या भवितव्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.