Virat Kohli: ‘ओये बघ, माझा डुप्लिकेट बसलाय!’; विराटची ‘छोट्या चीकू’शी भेट, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

वडोदरा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी वडोदरा येथे एक अत्यंत हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची भेट त्याच्यासारख्याच हुबेहूब दिसणाऱ्या एका चिमुरड्या चाहत्याशी झाली. या भेटीचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी या लहान मुलाला ‘छोटा चीकू’ असे नाव दिले आहे.
या खास भेटीचा अनुभव सांगताना त्या लहान चाहत्याने सांगितले की, “मी एकदा विराटचे नाव घेतले, तेव्हा त्याने माझ्याकडे पाहिले आणि ‘थोड्या वेळात येतो’ असे सांगितले. त्यानंतर तो रोहित शर्माकडे गेला आणि म्हणाला, ‘ओये उधर देख, मेरा डुप्लिकेट बैठा है’. विराटने मला प्रेमाने ‘छोटा चीकू’ म्हणून हाक मारली. मला विराटची स्टाईल आणि त्याचे व्यक्तिमत्व प्रचंड आवडते.”
दरम्यान, केवळ मैदानाबाहेरच नाही, तर मैदानावरही विराटने आपली जादू दाखवली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ९१ चेंडूत ९३ धावांची दमदार खेळी साकारली. या खेळीसह विराटने श्रीलंकेचे दिग्गज खेळाडू कुमार संगकारा यांचा विक्रम मोडीत काढला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच, सर्वात जलद २८,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याचा टप्पाही त्याने गाठला आहे.
Virat Kohli said to Rohit Sharma, “Wha dekh Mera duplicate betha hai (Look, my duplicate is sitting there)”.
– Virat Kohli called him a Chota Cheeku 😭❤️ pic.twitter.com/b4r1DopMUa
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) January 12, 2026
पहिल्या सामन्याचा थरार –
वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने ५० षटकांत ८ बाद ३०० धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने ४९ व्या षटकात ६ गडी गमावून हे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठले. विराटने या विजयात मोलाचा वाटा उचलल्यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना १४ जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे.





