Operation Hawkeye | अमेरिकेने सिरियात मोठा हवाई हल्ला केला आहे. सीरियामध्ये १३ डिसेंबर रोजी झालेल्या एका हल्ल्यात अमेरिकेच्या दोन जवानांसह एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यासाठी अमेरिकेने इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेला जबाबदार धरत सीरियातील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ला केला. यात ISISचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, अमेरिकन सैन्याने ‘ऑपरेशन हॉकआय’ सुरू केलं आहे. या ऑपरेशनचा उद्देश हा इस्लामिक स्टेट नेटवर्क पूर्णपणे नष्ट करणं हा आहे, अशी माहिती अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी एक्सवर दिली आहे. नागरिकांवर आणि सैनिकांवर हल्ले सहन करणार नाही पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितले की, 13 डिसेंबर रोजी सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एक नागरिक ठार झाले, तर तीन सैनिक गंभीर जखमी झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही लष्करी कारवाई सुरू करण्यात आली. अमेरिका आपल्या नागरिकांवर आणि सैनिकांवर हल्ले सहन करणार नाही आणि अमेरिकन लोकांना लक्ष्य करणाऱ्या कोणालाही पाठलाग करून संपवले जाईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. तसेच येत्या काही दिवसांत आणखी लष्करी कारवाई होऊ शकते असा इशाराही पेंटागॉनने दिला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, या कारवाईचा एक भाग म्हणून मध्य सीरियामध्ये ISIS शी संबंधित सुमारे ७० अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये दहशतवाद्यांचे अड्डे, शस्त्रास्त्रे आणि प्रशिक्षण तळांचा समावेश होता. Operation Hawkeye | ‘दहशतवादी संघटनेला पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक प्रत्युत्तर दिलं जाईल’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या लष्करी कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं की, “हे हल्ले ISIS च्या बालेकिल्ल्यांना लक्ष्य करत आहेत. अमेरिकेवर हल्ला करण्याचा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक प्रत्युत्तर दिलं जाईल.” Operation Hawkeye | हेही वाचा : Flop Movies Of 2025: २०२५ मधील हे बिग बजेट बॉलीवूड चित्रपट ठरले फ्लॉप; ‘इमर्जन्सी’ ते ‘वॉर २’चा समावेश