Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडच्या नदी सुधार प्रकल्पाचा फटका बाणेर-बालेवाडीला; नदीपात्र अरुंद झाल्याने पूरस्थिती गंभीर
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पाच्या कामाचा फटका आता पुणे शहरातील बाणेर-बालेवाडी परिसराला बसत असल्याचे चित्र समोर येत आहे.

Pimpri-Chinchwad – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पाच्या कामाचा फटका आता पुणे शहरातील बाणेर-बालेवाडी परिसराला बसत असल्याचे चित्र समोर येत आहे.
पिंपळे निलख आणि वाकड परिसरात नदी सुधार प्रकल्पाच्या कामादरम्यान नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आल्याने नदीचे नैसर्गिक पात्र अरुंद झाले असून, त्याचा परिणाम म्हणून मुसळधार पावसाच्या काळात बाणेर-बालेवाडी परिसरातील नदीकाठच्या निवासी भागांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना वाढत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुळा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत नदीचे नैसर्गिक वहनक्षेत्र कमी झाल्याने पाण्याचा प्रवाह बाणेर-बालेवाडीच्या दिशेने वेगाने येत असून, नदीलगतच्या अनेक भागांमध्ये पाणी साचणे आणि काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, पिंपळे निलख आणि वाकड परिसरात नदी सुधार प्रकल्प राबविताना नदीपात्रात भराव टाकून नदीची रुंदी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात नदीच्या पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे होत नसून, पाण्याचा दाब खालच्या भागातील बाणेर आणि बालेवाडी परिसरावर पडत आहे. यामुळे या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे.
नदी सुधार प्रकल्प राबविताना पर्यावरणीय परिणामांचा आणि नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचा पुरेसा अभ्यास करण्यात आला होता का, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. नदीपात्रातील बदलांमुळे भविष्यात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून नदी सुधार प्रकल्पाच्या कामाचा बाणेर-बालेवाडी परिसरावर नेमका काय परिणाम झाला आहे, याचा सखोल अभ्यास करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तसेच, नदीपात्रातील अडथळे दूर करून पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरत आहे.
“पिंपळे निलख परिसरात नदी सुधार योजनेअंतर्गत नदीपात्रात भराव टाकून करण्यात आलेल्या चुकीच्या कामांचा फटका आता बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांना बसताना दिसत आहे. नदीची नैसर्गिक रुंदी आणि पाण्याचा प्रवाह बदलणे हे भविष्यात अत्यंत धोकादायक ठरू शकते.
यावर्षी केवळ दोन दिवसांच्या पावसात प्रथमेश पार्क आणि ज्युपिटर हॉस्पिटल परिसरात नेहमीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात पाणी आले असून, अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती.
सध्या देखील पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नदी सुधार प्रकल्पाच्या कामांची चौकशी करावी, अन्यथा भविष्यात बाणेर-बालेवाडीतील हजारो नागरिकांना याचा मोठा फटका बसू शकतो.”
– सुधीर ताम्हाणे (स्थानिक नागरिक)





