मुंबई : राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष, पक्षाचे नाव, चिन्ह यावरून गोंधळ सुरु असताना तिकडे मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ‘मसल मॅन’ म्हणून सर्वांना परिचित असणारे मनीष धुरी यांनी पक्षातील सर्व पदाचा अचानकपणे राजीनामा दिला आहे. मनसेचे ‘मसल मॅन’ मनीष धुरी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धुरी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मनसेला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसेच्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर धुरी यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याची माहिती देखील दिली आहे.
मनीष धुरी मनसेचे अंधेरी विभाग अध्यक्ष होते. धुरी हे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत. मनसेच्या अनेक आंदोलनात मनीष धुरी यांचा आक्रमक सहभाग होता. त्यांनी राज ठाकरे यांना पत्र पाठवून सर्वच पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पक्षात अचानक खळबळ उडाली. तसेच धुरी यांच्या जागी अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार अशी चर्चा आता रंगली आहे.
राज ठाकरे यांना पत्र लिहून मनीष धुरी यांनी सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दलही त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले. वैयक्तिक कारणामुळे मी सर्व पदांचे राजीनामे देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले आहे. तर यापुढे पक्षात राज ठाकरे समर्थक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचाही शब्द त्यांनी पत्रात राज ठाकरे यांना दिला आहे. पश्चिम उपनगरातील पक्षांतर्गत गटबाजीमुळेच धुरी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे.