Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी सोडला पक्ष
महाविकास आघाडीतून, विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून (Uddhav Thackeray) नेते व पदाधिकाऱ्यांची गळती सुरूच आहे.

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभा निवडणुकीत पत्करावा लागलेला पराभव महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का ठरला. या निकालांनंतर महाविकास आघाडीतून, विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून (Uddhav Thackeray) नेते व पदाधिकाऱ्यांची गळती सुरूच आहे.
आतापर्यंत पक्षातील अनेक प्रमुख चेहरे सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये दाखल झाले असतानाच, ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाविकास आघाडीतीलच मित्रपक्षाकडून मोठा राजकीय धक्का बसला आहे.
शिवसेना (UBT) चे विभाग समन्वयक बिपीन गेहलोत यांच्यासह शेकडो प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (SP) चे ज्येष्ठ नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या घडामोडीमुळे ठाण्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून, महाविकास आघाडीच्या अंतर्गतच आता राजकीय चढाओढ सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे परखड वक्तव्य
या पक्षप्रवेशावेळी माध्यमांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशातील सद्य सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. आव्हाड म्हणाले “आज स्वातंत्र्य दिनी बिपीन गेहलोत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पक्षात (Uddhav Thackeray) प्रवेश झाला आहे. देश स्वतंत्र झाला असला, तरी अलीकडच्या घटनांनी मन व्यथित केले आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला असो वा मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणानंतर ती जागा गंगाजलाने शुद्ध करण्याचा प्रकार असो केवळ दलित असल्याने अशा घटना घडणे संतापजनक आहे.”
महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समता प्रस्थापित केली, असे सांगत आव्हाड पुढे म्हणाले, “संविधान मिटवू पाहणाऱ्या मनुवादी आणि जातीयवादी मानसिकतेविरोधात ही वैचारिक लढाई आहे. आम्ही अखेरपर्यंत या मानसिकतेशी संघर्ष करत राहू.”






