Sunil Ahir : उद्धव ठाकरेंचा आणखी एक विश्वासू नेता फुटणार? चर्चांना उधाण, मुंबईत नेमकं काय चाललयं?
Sunil Ahir : नुकत्याच मुंबईत झालेल्या शिंदे गटाच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे सुनील अहिर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

Sunil Ahir : आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि ठाकरे कुटुंबीयांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. शिंदे यांनी सचिन अहिर यांच्यावर विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी सोपवत त्यांना आपल्या गटात खेचण्यात यश मिळवले. त्यानंतर आता सचिन अहिर यांचे बंधू सुनील अहिर हेदेखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
ठाकरे गटाकडून बेस्ट समितीचे स्वीकृत सदस्यपद मिळालेले सुनील अहिर अलीकडच्या काळात शिंदे गटाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सातत्याने उपस्थित राहताना दिसत आहेत. नुकत्याच मुंबईत झालेल्या शिंदे गटाच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे सुनील अहिर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर सुनील अहिर यांची ठाकरे गटाकडून बेस्ट समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेत्यांनी अहिर कुटुंबीयांना देण्यात आलेल्या विविध पदांचा उल्लेख करत टीका केली होती.
सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर सुनील अहिर हेही बेस्ट समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. मात्र, अद्याप ते ठाकरे गटाकडून बेस्ट समितीवर सदस्य आहेत. दुसरीकडे, ते शिंदे गटाच्या कार्यक्रमांमध्ये उघडपणे सहभागी होत असल्याने त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सचिन अहिर यांना पक्षात घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पक्षबांधणीची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. नुकतीच विधानभवनात शिंदे गटाच्या नगरसेवकांची सचिन अहिर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील पक्ष संघटन मजबूत करण्यासह नगरसेवकांच्या प्रभागातील प्रश्नांवर चर्चा झाल्याचे समजते.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला तुलनेने चांगले यश मिळाले असले, तरी शिंदे गटाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे, मुंबई हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असल्याचे निवडणुकीच्या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्यामुळे मुंबईच्या राजकारणाची बारकाईने माहिती असलेल्या सचिन अहिर यांच्यावर शिंदे यांनी पक्षबांधणीची सूत्रे सोपवल्याचे मानले जात आहे.





