संगमनेर – थेट तहसीलदारांच्या घरी मध्यरात्री एका इसमाने शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या घरी शुभम थोरात काल (सोमवार) रात्री एकच्या सुमारास घरी आला. घराच्या प्रवेशद्वारामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून त्यांच्या घराची बेल वाजवली. घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता त्याने तहसीलदारांना शिवीगाळ केली. त्यामुळे थोरात याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मालदाड रोड परिसरात राहणारा शुभम थोरात हा सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मालपाणी नगर परिसरातील घरी गेला. त्याने तहसीलदारांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून त्यांच्या घराची बेल वाजवली. त्याने घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांनी दरवाजा न उघडल्याने या वाळूतस्कराने दरवाजावर थापा मारून शिवीगाळ केली. यानंतर तहसीलदारांनी आपल्या घराचा दरवाजा उघडला. तुम्ही माझा कॉल का घेतला नाही असे म्हणून त्याने तहसीलदारांना शिवीगाळ करत धमकावले.
याबाबत तहसीलदार धीरज बाळासाहेब मांजरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम थोरात (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मालदाड रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.