IND vs NZ 1st Test (Day 2) : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी बंगळुरू येथे खेळली जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कहर पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाचा डाव अवघ्या 46 धावांवर गारद झाला. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 20 धावा केल्या. त्याचवेळी न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. विल्यम ओरुकला 4 यश मिळाले. टीम साऊदीने 1 विकेट घेतली.
न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या 46 धावांवर बाद झाल्यानंतर भारताच्या नावावर अनेक नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे. पहिल्या डावात भारताच्या नावावर नोंदवल्या गेलेल्या 5 नको असलेल्या विक्रमांवर आपण एक नजर टाकूया…..
1. घरच्या मैदानावर भारताची सर्वात निच्चांकी धावसंख्या –
घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. यापूर्वी 1987 मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 75 धावांवर मर्यादित राहिला होता. तर हा सामना दिल्लीत झाला होता. कसोटी इतिहासात भारताची सर्वात कमी धावसंख्या 36 धावा आहे. तर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या 42 धावांची आहे. अशा प्रकारे भारताने कसोटी इतिहासातील तिसरी सर्वात कमी धावसंख्या केली.
2. आशियाई भूमीवर सर्वात कमी धावसंख्या –
आशियाई भूमीवर कसोटी सामन्यांमध्ये भारताची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 1986 मध्ये वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तानविरुद्ध 53 धावांवर सर्वबाद झाला होता. आशियाई भूमीवर कसोटी सामन्यातील ही सर्वात कमी धावसंख्या होती, मात्र आता हा नकोसा विक्रम भारताच्या नावावर नोंदवला गेला आहे. याशिवाय फैसलाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ 53 धावांवर सर्वबाद झाला होता. तर पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ 59 धावांत गारद झाला होता. ही कसोटी 2002 मध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेली होती.
Five ducks today in India’s scorecard 🦆https://t.co/Ps7bTvmcD4 #INDvNZ pic.twitter.com/xaF6KFjPec
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 17, 2024
3. टॉप-7 फलंदाजांमध्ये सर्वाधिक फलंदाज शून्यावर बाद –
बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात भारताच्या आघाडीच्या 7 फलंदाजांपैकी 4 फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत. विराट कोहलीशिवाय सर्फराज खान, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा शून्यावर बाद झाले. भारतीय संघाचे टॉप 7 पैकी 4 फलंदाज शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतण्याची कसोटी इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
4. भारताच्या टॉप-4 फलंदाजांच्या सर्वात कमी धावा –
भारताच्या टॉप-4 फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, यशस्वी जैस्वालने 13 धावा केल्या, रोहित शर्माने 2 धावा केल्या, विराट कोहली आणि सरफराज खान एकही धाव न काढता बाद झाले. अशा प्रकारे भारताचे टॉप-4 फलंदाज केवळ 15 धावाच जोडू शकले. यापूर्वी डिसेंबर 1979 मध्ये पाकिस्तानविरुद्ध अव्वल-4 फलंदाजांना केवळ 10 धावा करता आल्या होत्या.
5. सहा विकेटवर दुसरी सर्वात कमी धावसंख्या –
भारताचे टॉप-6 फलंदाज केवळ 34 धावाच जोडू शकले. भारताच्या टॉप-6 फलंदाजांनी त्यांच्याच भूमीवर केलेली ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. त्याचबरोबर कसोटी इतिहासात भारताच्या टॉप-6 फलंदाजांच्या सहाव्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या आहे.