IND vs NZ 1st Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी बंगळुरू येथे खेळली जात आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे सामन्यात नाणेफेक होऊ शकली नव्हती आणि पहिला दिवस पूर्णपणे वाहून गेला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे आधी सुरू झाला आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर गारद झाला. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली.
त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंड संघाने पहिल्या 3 बाद 180 धावसंख्येपर्यंत मजल मारली असून 134 धावांच्या आघाडीसह कसोटीवर आपली पकड घट्ट केली आहे. खेळ थांबला तेव्हा रचिन रवींद्र 22 धावातर डॅरिल मिशेलने 14 धावांवर खेळत होते. रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांच्यात 26 धावांची भागीदारी झाली आहे. आतापर्यंत आर. अश्विन व्यतिरिक्त कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी भारताला प्रत्येकी 1 यश मिळवून दिलं आहे.
IND vs NZ 1st Test : पहिल्या कसोटीतून शुभमन गिलला का वगळलं, बीसीसीआयने केला खुलासा…
भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो…
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. 9 धावांच्या स्कोअरवर भारताला पहिला धक्का बसला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 2 धावा करून माघारी परतला. विराट कोहली एकही धाव न काढता बाद झाला. यानंतर सर्फराज खान शून्यावर मॅट हेन्रीचा बळी ठरला. अशाप्रकारे भारताचे टॉप-3 फलंदाज 10 धावसंख्येवरच तंबूत परतले होते.
त्यानंतर भारताच्या मधली फळीच्या फलंदाजांनीही निराशा केली. यशस्वी जैस्वाल 13 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर केएल राहुल सह अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन हे देखील शून्यावर माघारी परतले. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने काही काळ संघर्ष केला पण त्यालाही अपयश आले. रिषभ पंत 49 चेंडूत केलेल्या 20 धावा काढून बाद झाला. ही भारतीय संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर कुलदीप 2,बुमराह 1 धाव काढून बाद झाला तर मोहम्मद सिराज 4 धावा काढून नाबाद राहिला.
भारताच्या पहिल्या डावात फक्त 4 चौकार पाहायला मिळाले. यात पंतने 2 आणि यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज याने प्रत्येकी एक-एक चौकार मारला. न्यूझीलंडकडून मॅट हॅन्री याने भेदक गोलंदाजी केली. त्यानं 13.2 षटकात 15 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय विल्यम ओ’रुर्क याने त्याला सुरेख साथ देत 12 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. साउदीला रोहित शर्माच्या रुपात एक विकेट मिळाली.
That will be Stumps on Day 2 of the 1st #INDvNZ Test!
New Zealand move to 180/3 in the first innings, lead by 134 runs.
See you tomorrow for Day 3 action.
Scorecard – https://t.co/FS97LlvDjY#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZvoDdxdb0O
— BCCI (@BCCI) October 17, 2024
गोलंदाजांनी केला अपेक्षाभंग…
भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर गोलंदाजांकडून अपेक्षा होत्या, पण किवी सलामीवीरांनी गोलंदाजांना फारशी संधी दिली नाही. न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि ड्वेन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. टॉम लॅथम 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. टॉम लॅथमला कुलदीप यादवने बाद केले. यानंतर ड्वेन कॉनवे आणि विल यंग यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोन्ही फलंदाजांनी सहज धावा जोडल्या. विल यंगच्या रूपाने न्यूझीलंडला दुसरा धक्का बसला. विल यंग 75 धावा करून रवींद्र जडेजाचा बळी ठरला. तर ड्वेन कॉनवे 91 धावा करून रवी अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
154 धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला, पण यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी डाव सावरत आणखी पडझड होऊ दिली नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल नाबाद माघारी परतले. आता भारतीय गोलंदाज तिसऱ्या दिवशी लवकरात लवकर न्यूझीलंडचा डाव गुंडाळायचा प्रयत्न करतील. त्याचवेळी न्यूझीलंड आपल्या पहिल्या डावातील आघाडी जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करेल. बंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज दमदार पुनरागमन करू शकतील की न्यूझीलंडला मोठी आघाडी घेईल? हे पाहणं औत्सुकतेचे ठरणार आहे त्यामुळे कसोटीच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ मजेशीर होणार आहे.