Satara | जिल्ह्यांतर्गत बदल्या विनाअट करण्याची शिक्षकांची मागणी

वडूज, (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत विनंती बदल्या करण्यात येणार आहेत. ही बाब शिक्षक वर्गासाठी आनंदाची असली, तरी या बदल्या विनाअट करण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.
नवीन शिक्षक भरती प्रक्रियेपूर्वी शिक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात याव्यात, असे परिपत्रक राज्य शासनाने पारित केल्यानंतर, सातारा जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शिक्षकांचे विनंती बदली अर्ज मागवण्यात आले.
या प्रक्रियेत बदलीस नकार देण्याची मुभा असल्याने, अनेक शिक्षकांनी बदल्यांसाठी अर्ज केले आहेत. मात्र, या बदल्यांसाठी सुगम क्षेत्रामधील सेवेची अट किती, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.
काही महिन्यांपूर्वी शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या होत्या. त्यावेळी पाटण, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यांमधील अनेक शाळा दुर्गम भागात असूनही, जिल्हा परिषद प्रशासनाच्या दुर्गम यादीत ही गावे नव्हती.
या अडचणीच्या ठिकाणी महिला व इतर शिक्षक रुजू झाले आहेत. अशा शाळांमधील संबंधित शिक्षकांना किमान एक वर्ष या अटीवर विनंती बदलीत संधी दिल्यास, महिला, गंभीर आजारी, पती-पत्नी एकत्रिकरण व ज्येष्ठ शिक्षकांना इतर तालुक्यांमधील रिक्त जागांवर काम करण्याची संधी मिळेल किंवा योग्य शाळा न मिळाल्यास ते आहेत त्याच शाळेत कार्यरत राहतील. त्यामुळे त्यांना विनाअट विनंती बदलीची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील शाळा सुगमच्या यादीत असल्या, तरी अनेक शाळा प्रत्यक्ष दुर्गम भागात आहेत. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षिका, गंभीर आजारी व ज्येष्ठ शिक्षकांच्या अडचणी लक्षात घेऊन, त्यांना पाच वर्षे, तीन वर्षे सेवेची अट लावू नये. त्यांच्या अर्जांचा विचार करून, विनंती बदलीत एक संधी देण्यात यावी. – कुंदा लोखंडे, शिक्षिका, कठरेवाडी.





