Satara | वडूजला धनगर समाजाचा मोर्चा व रस्ता रोको आंदोलन

वडूज, (प्रतिनिधी) – धनगर समाजाला एस. टी. आरक्षण मिळावे या मागणीसाठी खटाव तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी वडूज येथे मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुमारे दीड तास रस्ता रोको आंदोलन केले.
दहिवडी रस्त्यावर अहिल्यादेवी चौकापासून मोर्चास प्रारंभ झाला. हुतात्मा चौक, बाजारपेठ, शेतकरी चौक, बाजार पटांगण, छ. संभाजी महाराज चौक, शहा पेट्रोल पंप मार्गे मोर्चा छ. शिवाजी चौकात आल्यानंतर या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर रास्ता रोको व सभेत झाले.
या ठिकाणी विविध वक्त्यांनी धनगड व धनगर हा भेद टाळून समाजाला तातडीने एस. टी. आरक्षण लागू करावे अशी मागणी केली. तर काहींनी केंद्र व राज्यातील महायुती सरकार, आ. जयकुमार गोरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
समाजाला लवकर आरक्षण दिले नाहीतर आगामी काळात गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. तर ज्येष्ठ नेते विश्वासराव काळे यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
या आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुधे, नगराध्यक्षा मनिषा काळे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या डॉ. प्रियांका माने, माजी सभापती विजयराव काळे, चंद्रकांत काळे, युवा नेते श्रीकांत काळे, आण्णासाहेब काकडे, डॉ. वैभव माने, अॅड. राहूल काळे, डॉ. महेश माने, खरशिंगेचे उपसरपंच दिनकरभाऊ शिंगाडे, अशोकराव काळे,
रमेश गलांडे, राघव काळे, धनाजी काळे, संदीप काळे, हणमंतराव कोळेकर, हरिभाऊ काळे, विक्रम काळे, नवनाथ काळे संतोष जानकर, राहूल सजगने, रमेश शिंगाडे, सोमनाथ बुधे, समीर डोंबाळे,
ज्ञानेश्वर काळे, संजय बरकडे, नांदोशी उपसरपंच नितीन खताळ, जगन्नाथ कोळपे, समीर गोरड, लता पडळकर आदि तसेच शेकडो समाजबांधव उपस्थित होते.
आंदोलनस्थळी जयमल्हारचा जयघोष
मोहनराव बुधे व अन्य काही कार्यकर्त्यांनी धोतर धनगरी फेटा तसेच काठी अन् घोंगडे अशी वेशभुषा केली होती. तर आंदोलनस्थळी येळकोट येळकोट जयमल्हार जयघोष करण्याबरोबर ओवी गायन,
गंजीनृत्य करण्याबरोबर उपस्थित कार्यकर्त्यांना भंडारा लावण्यात आला.नायब तहसिलदार सुनिल जाधव यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. तर पी. आय. घनशाम सोनवणे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
मान्यवरांचा जाहीर पाठिंबा
राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, काँग्रेस नेते रणजितभैय्या देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा. बंडा गोडसे, बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचे बंधू प्रकाश घार्गे, वंचितचे नगरसेवक तुषार बैले, तानाजीराव वायदंडे, रिपाइंचे सागर भिलारे आदीनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा व्यक्त केला.





