Satara | भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने वाकेश्वरकर हैराण

वडूज, (प्रतिनिधी) – भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे वाकेश्वर (ता. खटाव) येथील पांढरीचा माळ शिवारातील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करावा अशी मागणी होत आहे. नजीकच्या काळात या मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त केला नाही तर मृत जनावरे प्रशासनाच्या दारात आणून टाकू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते ऍड. सूरज धुमाळ यांनी दिला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, शनिवारी दुपारच्या वेळी चार पाच मोकाट कुत्र्यांच्या टोळीने वाकेश्वर येथिल माजी सैनिक कैलास बाजीराव धुमाळ यांच्या मालकीची तीन महिन्याची दोन कोकरे ठार मारली तर शेळी गंभीर जखमी केली आहे.
तर काही महिन्यांपूर्वी दत्तात्रय ज्ञानदेव फडतरे, तानाजी एकनाथ फडतरे यांची सहा महिन्यांचे रेडुक, भरत आनंदराव फडतरे यांच्या मालकीची अडीच वर्षाची रेडी ठार मारली आहे.तर जयवंत तानाजी मदने यांच्या गोठ्यातील गाईची कालवड गंभीर जखमी केली आहे.
पोल्ट्रीमुळे कुत्र्यांचा उच्छाद
माळावरती एक पोल्ट्री आहे. या पोल्ट्रीतील मृत कोंबड्यामुळे कुत्र्यांची टोळी सोकावली आहे. ज्यावेळी कोंबड्यांचे खुराक उपलब्ध होत नाही, त्यावेळी सदरची कुत्री परिसरातील गोठ्यातील बांधीव जनावरांना टार्गेट केले जाते. या संदर्भात पाठीमागे त्रस्त ग्रामस्थानी तहसिलदार कार्यालय व वडूज पोलीस ठाण्यात तक्रार ही दिली होती.
मात्र, त्यावर प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. तसेच मृत जनावरांचे शवविच्छेदन, पंचनामा करण्यास पशूसंवर्धन विभागाकडून टाळटाळ केली जात आहे.





