Satara | हिंसाचाराच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मोर्चा

वडूज, (प्रतिनिधी) – देशासह महाराष्ट्र राज्यात घडणाऱ्या विविध हिंसाचाराच्या घटनांच्या निषेधार्थ मंगळवारी वडूजमध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून व निदर्शने करीत प्रशासनाला निवेदन दिले. तसेच या घटनांबाबत केंद्र व राज्य सरकार गांभीर्याने घेत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.
जम्मू काश्मिर येथे भाविकांवर झालेला हल्ला तसेच विविध मुंबई येथे युवतीवर मंदिरात झालेला अत्याचार व तिचा करण्यात आलेला खून तसेच नाकवा यांच्या अंगावर गाडी घालून त्यांचा चिरडण्याच्या प्रकाराची घटना घडली आहे. या प्रकाराबाबत केंद्र व राज्य सरकार गांभीर्याने घेत नसल्याबद्दल महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी काही वेळ तहसिलदार कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. तसेच मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देऊन पिडीतांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. यावेळी उपनेत्या छाया शिंदे, जिल्हा संघटिका सलमा शेख, महिला तालुका प्रमुख मन्सुरा मुलाणी,
उपतालुका प्रमुख संध्या देशमुख, विभाग प्रमुख धनश्री इनामदार, कांचन जाधव, वैशाली बागल, सुनिता जाधव, संध्या चव्हाण, माधवी जोशी, रंजना निकम, रेखा सोनवणे, काजल बुचडे, माजी नगरसेवक व तालुका प्रमुख शहाजीराजे गोडसे, संतोष दुबळे, मधुकर मोहिते, हणमंत देवकर, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.





