‘मुंडेंनी माझा अंधारातून छळ केलाय’; मुलीला उद्देशून भावनिक पोस्ट करत शिक्षकाची आत्महत्या

बीड : बीडमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकाने भावनिक फेसबूक पोस्ट लिहून बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बीड शहरातील कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेडच्या केज शाखेजवळ ही घटना घडली. फेसबूक पोस्ट करत धनंजय अभिमान नागरगोजे ( रा, देवगाव, ता. केज, जि. बीड) या 30 वर्षीय शिक्षकाने आत्महत्या केली आहे.
आपल्या मुलीला उद्देशून लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितलं आहे. शिक्षकाने स्वत:चं आयुष्य संपवताना लिहिलेल्या पोस्टमध्ये आरोपींच्या नावाचाही उल्लेख केला आहे. तसेच “हे लोक मला हाल हाल करुन मारतील, मोठे लोक मला मारतील, मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही” अशा अनेक पोस्ट धनंजय नागरगोजे यांच्या फेसबूकवर टाकलेल्या दिसल्या आहेत.
धनंजय अभिमान नागरगोजे मागील 18 वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. 18 वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याचा आरोप केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शाळेच्या संचालकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
श्रावणी बाळा तुझ्या बापुला माफ कर
श्रावणी बाळा तुझ्या बापुला शक्य झालंच तर माफ कर. मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती. पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं. काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. मी कधी कुणाला दोन रूपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही. श्रावणी बाळा शक्य झालंच, तर तुझ्या बापूला एकदा माफ कर. कारण मी तुला एकटीला सोडून जात आहे. तुला अजून काहीच कळत नाही, तुझं वय आहेच किती… तीन वर्षे… तुला काय कळणार…. ज्यांना कळायला पाहिजे होतं, त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला. पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे.
हे लोकं मला हालहाल करून मारतील
विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हालहाल करून मारणार आहेत. मला मारण्याचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होत की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे काम करतोय. मला अजून पगार नाही. आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा होशील आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा होईल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आला
दरम्यान, इथून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत, या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती. पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्यायच या लोकांनी ठेवला नाही. बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्या शिवाय पर्याय नाही. श्रावणी मला माफ कर… मी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही, तरी पण शक्य झालं तर, जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर..आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला… अशी पोस्ट लिहून नागरगोजे यांनी आत्महत्या केली.





