SSC HSC Exams – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेत मास कॉपीबाबत सीसीटीव्ही कॅमेराच्या पुराव्यांवरून ८१ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना निलंबित केले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या कॉपी मुक्त अभियानाचा बोऱ्या वाजला असून बारावीच्या परीक्षेत बीड जिल्ह्यातील चौसाळा येथे कॉपीचे प्रकार झाले असून १७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मास कॉपीचा प्रकार आढळला असून यात पर्यवेक्षक केंद्र संचालकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग सीसीटीव्हीवरून आढळला. येथे २४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून २१ जणांना निलंबित केले आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात इंग्रजीच्या पेपरच्या कॉपीमुळे पर्यवेक्षक ५ शिक्षकांना निलंबित केले आहे. जमुडाफाटा येथे भौतकशास्त्राच्या पेपरला ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली. येथे तीन संस्थेच्या सहा शाळांमधील २८ कर्मचारी निलंबित केले आहे. गडचिरोलीला राज्यशास्त्र विषयाच्या मायक्रोनोट व चॅट जीपीटी प्रिंटआउट आढळल्या. याप्रकरणी तीन शिक्षक, एका शिपायाला निलंबित केले आहे. तुळजापूर तालुक्यात रसायनशास्त्राला नऊ विद्यार्थ्यांनी कॉपी केली. यातील काहीजणांकडे मोबाइल आढळले. येथे तीन शिक्षकांना निलंबित केले. बीड जिल्ह्यात परीक्षार्थ्यांची गैरसोय झाल्यामुळे मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई केली.