Accident News : महाराष्ट्रात अपघातांचे सत्र सुरूच; साताऱ्यात ५० फूट दरीत ट्रक कोसळून ४ ठार, तर बीडमध्ये दाम्पत्याचा मृत्यू
Accident News : सातारा जिल्ह्यातील कासरतळे येथे आयशर ट्रक दरीत कोसळून एका बालकासह ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Accident News : सातारा तालुक्यातील कासरतळे परिसरात शुक्रवारी एक भीषण अपघात घडला असून आयशर ट्रक तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलासह तीन महिलांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Accident News )
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबाचे पुनर्वसन झाल्यानंतर घरातील संसारोपयोगी साहित्य दुसरीकडे हलवण्याचे काम सुरू होते. यासाठी आयशर ट्रकमध्ये घरातील साहित्य भरले जात होते. ट्रकमध्ये घरगुती वस्तूंसह काही पाळीव जनावरेही होती. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचा अचानक तोल गेला आणि तो थेट खोल दरीत कोसळला. (Accident News )
अपघात इतका भीषण होता की, ट्रकमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच काही जनावरांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने ट्रक चालक बचावला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. (Accident News )
अपघाताचा मोठा आवाज ऐकताच कासरतळे परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. (Accident News )
गेवराईत टेम्पोच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू
दरम्यान, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातही भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर कोलगावजवळ टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. (Accident News )
मृतांची ओळख बाबुराव बाळे (६२) आणि मंगल बाळे (५८) अशी झाली असून ते शिरूर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा येथील रहिवासी होते. हे दाम्पत्य गेवराई येथे कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते दुचाकीवरून घरी परतत असताना हा अपघात झाला. (Accident News )
टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली आणि गंभीर दुखापतींमुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Accident News)





