Pune District : प्रतिदिन ८ हजार टनाहून अधिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट : जाचक
Pune District : पुणे जिल्ह्यात सर्वप्रथम हार्वेस्टिंग ॲडव्हान्सच्या पहिल्या हप्त्याचे वाटप करण्याचा मान 'छत्रपती' कारखान्याने मिळवला आहे.

भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२०२७ च्या गळीत हंगामाची पूर्वतयारी वेगाने सुरू आहे. आगामी हंगामासाठी कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील सुमारे १८ हजार एकर क्षेत्रावरील उसाची नोंद झाली असून, बाहेरील क्षेत्रातील नोंदी घेण्याचे कामही सुरू आहे. उसाची उपलब्धता विचारात घेऊन यंदा १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा उभारणी गतिमान झाली असून, करार केलेल्या मुकादमांना पहिल्या हप्त्याच्या ॲडव्हान्सचे वाटप मंगळवारी (दि. २३) कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आले. पुणे जिल्ह्यात सर्वप्रथम हार्वेस्टिंग ॲडव्हान्सच्या पहिल्या हप्त्याचे वाटप करण्याचा मान ‘छत्रपती’ कारखान्याने मिळवला आहे.
मागील हंगामातील ऊस तोडणी-वाहतुकीची बिले, कमिशन आणि डिपॉझिट यापूर्वीच वेळेत अदा करण्यात आले आहे. कारखान्याच्या या चोख आणि पारदर्शक व्यवहारामुळे ऊस तोडणी-वाहतूक मुकादमांनी संचालक मंडळाचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक ॲड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, निलेश टिळेकर, सतिश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे उपस्थित होते. तसेच कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर, मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे यांच्यासह बहुसंख्य ऊस तोडणी-वाहतूक मुकादम उपस्थित होते.
प्रतिदिन ८ हजार टनांपेक्षा जास्त गाळपाचे नियोजन
येत्या हंगामात प्रतिदिन ८ हजार मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा जास्त ऊस गाळप करण्याचे नियोजन असून, त्यादृष्टीने संचालक मंडळ ठोस योजना आखत आहे. कारखान्याचे सभासद व बिगर सभासदांनी आपला नोंदविलेला सर्व ऊस कारखान्यालाच देऊन सहकार्य करावे. तसेच वाहतूक मुकादमांनी करारातील सर्व वाहने व मजूर वेळेत हजर करून कारखान्याला पूर्ण क्षमतेने ऊस पुरवठा करावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केले.





