धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून लांब असलेले शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आगामी नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील महायुतीमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रथम मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेले तानाजी सावंत, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागल्यानंतर तानाजी सावंतांनी राजकारणाची सुत्रे पुन्हा आपल्या हाती ठेवण्यासाठी तयारीला सुरुवात केली. त्यातच सावंत यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अशी ओळख असणारे माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. या तणावामुळेच तानाजी सावंत यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. ते बोलताना म्हणाले की, महायुतीमध्ये असलो तरी आम्हाला आमचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही आमचा निर्णय घेतला असल्याचे सावंत यांनी सांगितले आहे. सावंत यांच्या एकला चलो या भूमिकेमध्ये परंडा नगरपरिषदेच्या निवडणूकीतील महायुतीच्या भवितव्यावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे.