Pune District : ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद
Pune District : अत्यावश्यक कामाशिवाय ताम्हिणी घाट मार्गावर प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महसूल विभाग, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

पौड : मुळशी तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ताम्हिणी घाट परिसरात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याचा धोका, रस्त्यावरून वाहणारे पाणी तसेच काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ताम्हिणी घाट मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पौड पोलिसांनी माले (ता. मुळशी) येथे कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
घाटाकडे जाणार्या वाहनांना माले येथे अडवून पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय ताम्हिणी घाट मार्गावर प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महसूल विभाग, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
सततच्या पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेतकर्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांचे खांब कोसळल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
महावितरणच्या कर्मचार्यांकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून काही गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. उर्वरित भागात दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून जारी करण्यात येणार्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संबंधित यंत्रणेशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





