Pune District : बनेश्वर रस्त्यावरील जुनी संरक्षण भिंत कोसळली; नव्या संरक्षण भिंतींना तडे, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
Pune District : याशिवाय रस्त्याच्या काही भागावरही भेगा पडल्याचे समोर आल्याने या संपूर्ण कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे.

नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर-बनेश्वर मंदिर या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सलग झालेल्या पावसामुळे रस्त्यालगतची जुनी संरक्षण भिंत कोसळली, तर नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतींना मोठमोठे तडे गेल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. याशिवाय रस्त्याच्या काही भागावरही भेगा पडल्याचे समोर आल्याने या संपूर्ण कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे.
स्थानिकांच्या मते, या भागातील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. डोंगर उतारावरून येणारे पाणी रस्त्याच्या एका बाजूने मोठ्या प्रमाणात खाली येते. मात्र, हे पाणी दुसऱ्या बाजूला सुरक्षितरीत्या सोडण्यासाठी ज्या ठिकाणी मोठ्या क्षमतेचे पाईप (कल्व्हर्ट) किंवा गटर लाईन असणे आवश्यक होते, तेथे ती व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी संपूर्ण पाणी रस्त्यालगत साचून संरक्षण भिंतीवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आणि अखेर जुनी संरक्षण भिंत कोसळली. योग्य जलनिस्सारण व्यवस्था केली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
नसरापूर ते बनेश्वर मंदिर हा सुमारे ७५० मीटर लांबीचा रस्ता खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यानंतर मंजूर झाला होता. या कामाचे भूमिपूजन खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्तेही भूमिपूजन पार पडले. मात्र काम सुरू झाल्यानंतर हा प्रकल्प जवळपास वर्षभर रखडला होता. स्थानिक नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी कामाला पुन्हा गती मिळाली.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण कामाची स्वतंत्र तांत्रिक गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, कामातील त्रुटींची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नसरापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
संरक्षण भिंतीला तडे
याचबरोबर, रस्त्याच्या कामांतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतींनाही काम सुरू असतानाच मोठमोठे तडे गेल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले होते. रस्त्यावरही अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दाखवून दिले होते. त्यावेळी दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात अपेक्षित सुधारणा झाल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.





