Pune District : पूरग्रस्त व्यापार्यांना तातडीने मदत द्या; चाकणमध्ये पंचनामे व चौकशीची भाजपची मागणी
Pune District : मात्र विक्रमी पावसानंतर शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि व्यापारी संकुले पाण्याखाली गेली. त्यामुळे खर्च होऊनही अशी परिस्थिती का निर्माण झाली, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी व्यापार्यांकडून करण्यात आली आहे.

चाकण :चाकण शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत व्यापारी, दुकानदार आणि लघुउद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक व्यावसायिक आस्थापनांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लाखो रुपयांचा माल, यंत्रसामग्री, संगणक, इलेक्ट्रिकल साहित्य, फर्निचर तसेच इतर मालमत्ता पाण्याखाली गेली. त्यामुळे अनेक व्यावसायिकांचे व्यवहार ठप्प झाले असून त्यांच्यासमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त व्यापार्यांचा तातडीने पंचनामा करून शासनाकडे नुकसानभरपाईचा प्रस्ताव पाठवावा, तसेच शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी आणि संबंधित अधिकार्यांच्या जबाबदारीची चौकशी करावी, अशी मागणी खेड तालुका चाकण मंडल भाजपचे अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी चाकण नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी प्रवीण करपे, अर्जुन बोराडे, दत्ता परदेशी, अजय जगनाडे, मंगेश देसाई, ज्ञानेश्वर बढे आणि श्रीकांत परदेशी उपस्थित होते. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पर्जन्यजल निचरा आणि जलनिस्सारण व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र विक्रमी पावसानंतर शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि व्यापारी संकुले पाण्याखाली गेली. त्यामुळे खर्च होऊनही अशी परिस्थिती का निर्माण झाली, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी व्यापार्यांकडून करण्यात आली आहे.
व्यापार्यांनी महसूल विभागाच्या समन्वयाने सर्व बाधित व्यापारी, दुकानदार आणि लघुउद्योजकांचा तातडीने पंचनामा करावा, प्रत्येक व्यावसायिकाच्या नुकसानीचा स्वतंत्र अहवाल तयार करून जिल्हाधिकारी व राज्य शासनाकडे विशेष आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवावा, तसेच नगरपरिषदेने विशेष सर्वसाधारण सभा बोलावून मदतीसाठी शासनाकडे ठराव पाठवावा, अशी मागणी केली आहे.
याशिवाय नालेसफाई, जलनिस्सारण व्यवस्था आणि पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या कामांची चौकशी करून संबंधित अधिकारी, ठेकेदार किंवा दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, शहरातील पूरग्रस्त भागांचे संयुक्त सर्वेक्षण करून कायमस्वरूपी पूरनियंत्रण आराखडा जाहीर करावा, तसेच बाधित व्यापार्यांना आवश्यक कागदपत्रे व प्रशासकीय मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
चाकण हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असल्याने येथील व्यापार्यांच्या समस्या दुर्लक्षित करता येणार नाहीत. पूरामुळे अनेक लघुउद्योजक आणि किरकोळ व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना तातडीने शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस कार्यवाही करावी; अन्यथा व्यापारी संघटना, नागरिक आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भगवान मेदनकर यांनी दिला आहे.





