Pune District : राज्यातील सर्वात मोठे दूध भेसळ रॅकेट उद्ध्वस्त
Pune District : तसेच ४९ नमुने तपासणीसाठी संकलित करण्यात आले असून पाच अन्न परवाने निलंबित आणि चार व्यवसाय बंद करण्यात आल्याची माहिती मंगळवार दि.७ रोजी देण्यात आली.

मंचर : अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी गुप्तवार्तेच्या आधारे राज्यातील कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित जाळ्यावर धडक कारवाई करत पुणे, अहिल्यानगर, सोलापूर,जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत एकाच वेळी संयुक्त धाडी टाकल्या. तपासात मंचर येथील सुशांत हिंगे हा मुख्य सूत्रधार, तर संदीप लोढा हा सल्लागार म्हणून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत सुमारे १.४८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट करण्यात आले. तसेच ४९ नमुने तपासणीसाठी संकलित करण्यात आले असून पाच अन्न परवाने निलंबित आणि चार व्यवसाय बंद करण्यात आल्याची माहिती मंगळवार दि.७ रोजी देण्यात आली.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात मंचर येथील सुशांत हिंगे हा मुख्य सूत्रधार, तर संदीप लोढा हा सल्लागार म्हणून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. संयुक्त धाडीदरम्यान विविध दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर्स, भेसळ द्रव्यांचे साठे, पॅकिंग केंद्रे तसेच कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली.
मे. नवकार वितरक (अवसरी बुद्रुक-मंचर), मे. हेमंत कॉर्पोरेशन (अकलूज), मे. पिरसाई मिल्क (आंबेगाव), मे.भैरवनाथ (मालवडी, ता.दौंड), मे. जय श्रीराम डेअरी फार्म (पिंपळगांव खडकी, ता.आंबेगाव), मे.मातोश्री दूध डेअरी (जळगाव सपकाळ, ता.भोकरदन, जिल्हा जालना), सोनू उर्फ चैतन्य घोरपडे (पिलीव, ता. माळशिरस, जिल्हा- सोलापूर),मे डेलीविश अग्रो डेअरी, (पिलीव, ता. माळशिरस), गुरुदत्त दूध शीतकरण केंद्र (कुडूस ता. खेड, जिल्हा पुणे) , सह्याद्री डेअरी, (कवठे यमाई, ता शिरूर), आनंदयोगी दूध संकलन, (पिलीव, ता. माळशिरस जिल्हा-सोलापूर), इंदापूर मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस लि सोनाई चिल्लीन सेंटर, (पिलीव, ता. माळशिरस), प्रमोद घोरपडे, (राहुरी, जिल्हा- अहिल्यानगर) येथील संबंधित केंद्रे तसेच इतर आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. या तपासात कृत्रिम दूध निर्मितीसाठी वापरण्यात येणारे विविध पदार्थ, उपकरणे, कागदपत्रे, व्यवहाराची नोंद, पुरवठा साखळीशी संबंधित माहिती तसेच वैज्ञानिक पुरावे हस्तगत करण्यात आले. आणखी बनावट दूध रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत असून मोठ्या प्रमाणात आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.
अशी व्हायची भेसळ…
तपासादरम्यान स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल यांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करून ते नैसर्गिक दुधात मिसळून विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.





