Pune District : कल्याण-अहमदनगर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
Pune District : मात्र आळे परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी करावा लागत असून वाहतुकीचाही खोळंबा होत आहे.

आळेफाटा : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील आळे परिसरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून, खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनांचे संतुलन बिघडून किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण, जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव आणि अहमदनगरला जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग असल्याने दररोज हजारो मालवाहू वाहने, एसटी बस, खासगी बस, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. मात्र आळे परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी करावा लागत असून वाहतुकीचाही खोळंबा होत आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. एका खड्ड्यापासून बचाव करण्यासाठी वाहन वळविताच समोर दुसरा खड्डा येत असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटण्याचा धोका वाढला आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्डे न दिसल्याने अनेक वाहनांचे टायर फुटणे, सस्पेन्शनचे नुकसान होणे तसेच दुचाकी घसरून चालक जखमी होण्याच्या घटना घडत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. अपुर्या प्रकाशामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनचालकांची अक्षरशः तारेवरची कसरत होत आहे. प्रवाशांना धक्कादायक प्रवासाचा सामना करावा लागत असून वाहनांच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्चही वाढत आहे.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित महामार्ग प्रशासनाने तातडीने मार्गाची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, तसेच रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यात या समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.





