Pune District : जिल्हा परिषद सदस्या पूरग्रस्तांच्या मदतीला
Pune District : उभी पिके, जनावरांचा चारा, शेतीसाठी आवश्यक साहित्य आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

पारगाव : पारगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पारगाव – वरवंड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या डॉ. गायत्री खळदकर व पारगाव -पिंपळगाव गणाच्या पंचायत समिती सदस्या मनीषा ताकवणे यांनी पिंपळगाव, देलवडी, पारगाव, नानगाव येथील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आला असून नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचे कृषीपंप पाण्याखाली गेले आहेत. उभी पिके, जनावरांचा चारा, शेतीसाठी आवश्यक साहित्य आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना डॉ. गायत्री खळदकर यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रशासनाने कोणताही विलंब न करता नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावेत तसेच शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत व आवश्यक दिलासा द्यावा, नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.





