Talegaon Dhamdhere – एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंत्यविधी तातडीने पार पडणे अपेक्षित असते, मात्र तळेगाव ढमढेरे येथे एका इसमाच्या आकस्मिक मृत्यूनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहाची मोठी हेळसांड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरांच्या चालढकलपणामुळे हा मृतदेह दिवसभर रणरणत्या उन्हात पडून राहिल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेली माहिती अशी की, तळेगाव ढमढेरे येथील न्हावरा रोड लगत एका शेतामध्ये १४ मे रोजी सकाळी एक अज्ञात मृतदेह आढळला. शिक्रापूरचे पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, अतुल पखाले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मृतदेहाचे विघटन सुरू झाल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत जागेवरच शवविच्छेदन करणे आवश्यक असल्याने पोलिसांनी तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. मात्र, तेथे एकही वैद्यकीय अधिकारी किंवा पोलिसांचे निवेदन स्वीकारणारा कर्मचारी उपस्थित नव्हता. यानंतर पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या कारंडे व डॉ. विनीत राठोड यांच्याशी संपर्क साधला, परंतु दोघांनीही रजेचे कारण सांगून जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यास सुरुवात केली आणि नंतर त्यांचे संपर्क क्रमांक बंद झाले. यामुळे दिवसभर मृतदेह उन्हात पडून राहिला. अखेर सायंकाळी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावर, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमनी यांनी सायंकाळी सहा वाजता घटनास्थळी पोहोचून शवविच्छेदन केले. या हलगर्जीपणाबद्दल दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी झटकली जबाबदारी तळेगाव ढमढेरे येथील घडलेल्या प्रकाराबाबत तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या कारंडे व डॉ. विनीत राठोड या दोघांशी संपर्क साधला असता दोघांनी प्रकृतीचे कारण देत सुट्टी व रजेवर असल्याचे सांगितले. “तळेगाव ढमढेरे येथील घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः घटनास्थळी जाऊन शवविच्छेदन केले. मात्र तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन्ही अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचे दिसून आले असल्याने आपण त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहोत.” – डॉ. राजेश कट्टीमनी, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी