Talegaon Dhamdhere : तळेगाव ढमढेरेचा आठवडे बाजार उन्हाने ‘गार’! भरदुपारी शुकशुकाट, तर सायंकाळी प्रचंड गर्दी
Talegaon Dhamdhere : तळेगाव ढमढेरेत कडक उन्हाचा आठवडे बाजारावर परिणाम; दुपारी शुकशुकाट असल्याने व्यापारात झाली मोठी घट.

Talegaon Dhamdhere – पारंपरिक आठवडे बाजारात सोमवारी (दि. ११) कडक उन्हाचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात ग्राहकांची नेहमीप्रमाणे वर्दळ होती, मात्र दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता कमालीची वाढल्याने नागरिकांची अक्षरशः लाही-लाही झाली. वाढत्या उष्णतेमुळे भरदुपारी बाजारात शुकशुकाट दिसून आला असून, याचा फटका व्यापारी व ग्राहक दोघांनाही बसला आहे.
दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे अनेक नागरिकांनी झाडांचा आणि दुकानांच्या आडोशाचा आधार घेतला. उष्णतेचा सर्वाधिक त्रास वृद्ध, महिला व लहान मुलांना सहन करावा लागला. उकाड्यामुळे ग्राहकांनी दुपारच्या वेळी खरेदी टाळून घरी जाणे पसंत केल्याने काही काळ विक्री मंदावली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास उन्हाची तीव्रता कमी होताच चित्र पालटले. गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे सायंकाळी बाजार पुन्हा गजबजलेला पाहायला मिळाला.
“दुपारी तीव्र उन्हामुळे ग्राहकांची ये-जा खूप कमी झाली होती, त्यामुळे धंद्यावर मोठा परिणाम झाला. उकाड्यात काम करणेही खूप कठीण झाले होते. मात्र सायंकाळी वातावरण काहीसे थंड झाल्यानंतर ग्राहक पुन्हा बाजारात आले. त्यामुळे व्यापाराला काही प्रमाणात चालना मिळाली.”
– भगवान खुरपे, हॉटेल विक्रेते व्यापारी
“उन्हामुळे बाजारात फिरताना खूप त्रास झाला. खरेदी लवकर आटपावी लागली. सावली व पाण्याची सोय नसल्याने अडचण झाली. मात्र सायंकाळी वातावरण थोडे बरे झाल्यानंतर बाजारात पुन्हा गर्दी वाढलेली दिसली.”
– बाळासाहेब ढमढेरे, ग्रामस्थ तळेगाव ढमढेरे





